अमरावती: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती उद्भवली असून काही गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, काल रात्री बेंबळा नदीच्या पुरात अडकलेल्या नऊ जणांना तर राजुरा येथील मोखड नदीच्या पुरातून बोटीच्या सहाय्याने सात जणांना सकुशल बाहेर काढण्यात बचाव पथकला यश प्राप्त झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी परिस्थितीची दखल घेतली. नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी व कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाला अत्यंत सतर्क राहून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
नेमके काय घडले?
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर गावाजवळील बेंबळा नदीला आलेला प्रचंड पुरामुळे आठ ते दहा इसम अडकल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय मधील नियंत्रण कक्षाला काल रात्री ११ वाजताच्या सुमारास मिळाली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथक घटनास्थळी रात्री १२ वाजता पोहचले आणि तत्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले.
नऊ जणांना वाचवण्यात यश
संग्रामपूर गावातील पुरामध्ये अडकलेले लोक छतावरून बचाव पथकाची वाट पाहत होते. बचाव पथकातील सदस्यांनी पूरग्रस्त लोकांना धीर दिला. वयस्कर आणि लहान मुलांना प्राधान्य देत बोटीमध्ये बसवून सुरक्षित जागेवर आणले. रात्रीची वेळ असल्यामुळे बोट चालवण्यात अडचणी निर्माण होत होत्या. तरीही बचाव पथकाने प्रयत्नांची शर्थ केली.
दुसऱ्या घटनेत काय झाले?
राजुरा येथे मोखड नदीच्या पुरात काही गावकरी अडकले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाल्यानंतर बचाव पथकातील सदस्यांनी रबर बोटीच्या सहाय्याने पुरात अडकलेल्या लोकांचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना झाडी-झुडूपे, ओंडक्यांमधून वाट काढावी लागली. विषारी सापांचाही सामना करावा लागला. अंधार असल्याने पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी बऱ्याच अडचणी आल्या. नंतर अवघ्या अर्ध्या तासात बचाव पथकाने ४ महिला, २ वर्षांचे बाळ आणि ४ पुरूष अशा सात जणांची पुराच्या पाण्यातून सुटका केली. बोटीच्या सहाय्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले. दोन ठिकाणी बचाव पथकाच्या सतर्कतेमुळे एकूण १६ जणांना वाचवण्यात यश आले.
