अमरावती : शहरातील कचरा समस्या गंभीर बनली असून शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. महापालिका प्रशासन कचरा उचलण्यास असमर्थ ठरली असल्याने शहरात घाण, दुर्गंधी आणि आजार वाढले आहेत.
तरीही महापालिका प्रशासन कंत्राटदारांवर मेहरबानी दाखवत असल्याचा आरोप भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी करत थेट महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी कचरा फेकून आंदोलन केले. अचानक झालेल्या या ‘कचराफेक’ आंदोलनामुळे महापालिका मुख्यालयात एकच खळबळ उडाली होती.
आंदोलकांनी यावेळी महापालिका आयुक्तांना गवताचा ‘बुके’ देण्याचाही प्रयत्न केला. रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आलेल्या झाडाच्या फांद्या आंदोलकांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आणल्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भीम ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांना यावेळी निवेदन सादर केले. आयुक्तांनी तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
कचरा उचलण्यासाठी महापालिकेने कंत्राटदार नेमलेला असताना सुद्धा शहरातील अनेक भागात कचरा तसाच पडून आहे. कचरा न उचलताच कोट्यवधी रुपयांची देयके मंजूर केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
शहरात स्वच्छता कंत्राटदारांची मनमानी सुरु असून कुठल्याही प्रकारची स्वच्छता दिसून येत नाही. कचरा ठिकठिकाणी पडलेला दिसतो. राहुल नगर, बिच्छु टेकडी भागात घरासमोरील नाल्यांची स्वच्छता झाली असल्याने नालीतील किडे हे घरांत प्रवेश करत आहेत. आरोग्यासाठी हे अत्यंत धोकादायक आहे. शौचालयाची सुध्दा साफ सफाई होत नसून त्या ठिकाणी घाण पसरलेली आहे.
अशा परिस्थितीमध्ये आम्ही जेव्हा कंत्राटदार यांच्याशी चर्चा करीत असतो, तेव्हा ते आम्हाला लोकप्रतिनिधींचे बळ आमच्या पाठीशी आहे, असे म्हणून टाळाटाळ करतात आणि महापालिकेतून कोट्यवधी रुपयांची देयके काढतात, असा आरोप राजेश वानखडे यांनी केला. या भागात महापालिका आयुक्तांनी एकवेळ भेट द्यावी, अशी विनंती राजेश वानखडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे. पावसाळ्यात साचलेले पाणी, कचरा यामुळे डासांची उत्पत्ती होत असते. परिणामी, डेंग्यू, मलेरिया यांसह अन्य आजार उद्भवत असतात. आरोग्य विभागाकडून दरवर्षी सर्वेक्षण केले जाते. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करूनही खाद्यपदार्थांचे वेष्टन, नाशवंत वस्तू यांसह प्लॅस्टिकसह अन्य कचरा दिसून येत आहे.
महापालिका प्रशासनाने उपायोजना आखाव्यात, अशी मागणी केली जात आहे. दुसरीकडे, नागरिकांनी कचरा कुठेही न भिरकावता कचराकुंडीत जमा करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.