अमरावती : गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यात आला असून कोंडेश्वर नजीकच्या आलियाबाद येथील ११.२९ हेक्टर जागेचा अंतिम ताबा वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाला प्रदान करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘ट्वीट’ करून ही माहिती दिली आहे.
आलियाबाद येथील सर्व्हे क्रमांक ९/१ मधील ११.२९ हेक्टर जागेवर १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यासाठी आरोग्य व वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतील.
अमरावती व परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होईल. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मला अभिमान वाटतो. या जिल्ह्यातील नागरिकांनी ही मागणी केली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळू शकले. आज जागेच्या निकड मार्गी लागली. पालकमंत्री म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन:पूर्वक आभार मानतो, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
जागेचा प्रश्न चर्चेत का होता?
आलियाबाद येथील जागा शहरापासून १५-२० किलोमीटर लांब असल्याने तेथे रुग्णांना जाणे गैरसोयीचे होणार आहे. त्यामुळे या जागेसंदर्भात तत्कालीन समितीने घेतलेल्या निर्णयाबाबत फेरविचार करावा तसेच सोयीची ठरणाऱ्या नागपूर महामार्गालगतच्या जागेचा प्रस्ताव मान्य करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती. वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी साधारणपणे ६०० ते ७०० कोटी रुपये लागणार आहेत. मात्र महाविद्यालय हे शहरापासून दूर असल्यास तिथे रुग्णच पोहचू शकणार नसल्याने एवढा मोठा खर्च व्यर्थ जाईल, असे संजय खोडके यांनी सांगितले होते.
शहराच्या मध्यवस्तीत असलेली ‘मोसिकॉल’ची (महाराष्ट्र राज्य तेलबिया व्यापार व औद्योगिक महामंडळ) २४ एकर जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अधिग्रहित करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रदीप बाजड यांनी केली होती. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांना तत्पर सेवा मिळण्यासाठी मध्यवस्तीत जागा असणे आवश्यक आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) आणि जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) ही दोन्ही मोठी रुग्णालये शहराच्या मध्यभागी आहेत. मोसिकॉलची २४ एकर जमीन या दोन्ही रुग्णालयांपासून जवळच आहे, असे त्यांचे म्हणणे होते.

