scorecardresearch

बुलढाणा : लिंगाडे पिता-पुत्राचा अनोखा विक्रम; तब्बल साडेचार दशकांनंतर राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती

तब्बल साडेचार दशकानंतर बुलढाण्यासह विदर्भातील एका राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. लिंगाडे पिता-पुत्रानी एक अभूतपूर्व राजकीय विक्रम रचला आहे.

unique record Dhiraj Lingade
डावीकडे रामभाऊ लिंगाडे आणि उजवीकडे त्यांचे पुत्र धीरज लिंगाडे (image – loksatta team/graphics)

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत धीरज लिंगाडे विजयी झाल्यामुळे तब्बल साडेचार दशकानंतर बुलढाण्यासह विदर्भातील एका राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. लिंगाडे पिता-पुत्रानी एक अभूतपूर्व राजकीय विक्रम रचला आहे.

आजवरच्या काळात दिग्गज राजकारण्यांना घडवणाऱ्या नागपूर विद्यापीठातच धीरज लिंगाडे यांचे पिताश्री रामभाऊ लिंगाडे यांनी राजकारणाचे धडे गिरवले. त्यानंतर युवक काँग्रेसच्या माध्यमातून केवळ बुलढाणा जिल्हा, विदर्भच नव्हे तर राज्याच्या राजकारणात त्यांनी आपला ठसा उमटवला. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी युवकांची मोठी फळी उभारली. त्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत जुळलेले स्नेहसंबंध त्यांनी आमरण जोपासले. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर त्यांनीही हाती घड्याळ बांधले. त्यामुळे शरद पवार यांच्या आदेशानेच अमरावती विभागातील राष्ट्रवादी धीरज लिंगाडे यांच्या प्रचारासाठी ताकदीने भिडली.

हेही वाचा – “महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते”, डॉ. अभय भंग यांचा गंभीर आरोप

दरम्यान, सत्तरीच्या दशकात विदर्भातील ११ जिल्ह्यांचा समावेश असलेला नागपूर पदवीधर मतदारसंघ अस्तित्वात होता. मतदारसंघात जनसंघाचे वर्चस्व होते. त्या काळात सन १९७१-७२ मध्ये झालेल्या विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्याची हिम्मत रामभाऊ लिंगाडे यांनी दाखविली. त्या लढतीत ते तीन हजार मतांच्या फरकाने हरले. मात्र, ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ या जिद्दीने ते कार्यशील राहिले. या पराभवाचे उट्टे त्यांनी १९७८ मध्ये झालेल्या विधानपरिषदेच्या अकोला-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयाने काढले. यानंतर मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री झालेत.

वडील आणि मुलगा विधान परिषद सदस्य

तब्बल ४५ वर्षांनी त्यांचे राजकीय वारसदार आणि सुपूत्र धीरज लिंगाडे यांच्या रुपाने या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. वडिलांनी ज्या सभागृहाचे प्रतिनिधित्व केले त्याच सभागृहात धीरज लिंगाडे हे आमदार म्हणून सहावर्षे वावरणार आहेत. विदर्भातील हा कदाचित एकमेव राजकीय विक्रम ठरावा. राज्यातही हा दुर्मिळ राजकीय चमत्कार असेल. या विक्रमाने सर्वाधिक आनंद जिल्ह्यात अनेक नेते घडवणारे रामभाऊ लिंगाडे यांना झाला असता, मात्र ते आज हयात नाहीत. लिंगाडे पिता-पुत्राचा हा राजकीय विक्रम अभूतपूर्व म्हणावा असाच आहे, हे निश्चित!

हेही वाचा – आप, वंचित, बसपाची मतांची मजल मर्यादितच

गृहराज्यमंत्री पदाचा योगायोग!

विधानपरिषद सदस्य झाल्यावर रामभाऊ लिंगाडे हे गृहखात्याचे राज्यमंत्री होते. (याशिवाय अन्य खातीही होती) त्यांच्या पुत्राबरोबर दोन हात करणारे रणजित पाटील यांनीही गृहराज्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळला. यामुळे राजयोगाचे ‘मासलेवाईक’ उदाहरण ठरलेले आमदार धीरज लिंगाडे याना कदाचित भविष्यात लाल दिव्याची संधी मिळाली आणि हेच खाते मिळाले तर आणखी एक राजकीय वर्तुळ पूर्ण होऊ शकते. सध्यातरी तरी ही एक रंजक कल्पना आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 13:43 IST