अमरावती: येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागाला गेल्या महिन्यात लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे एक सीसीटीव्ही चित्रिकरण समोर आले आहे. हृदयाचा थरकाप उडवून देणाऱ्या या घटनेच्या वेळी दोन परिचारिका कक्षासमोरील लॉबीत झोपलेल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. या चित्रिकरणाच्या आधारे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केली आहे.

सीसीटीव्हीत नेमके काय?

जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात गेल्या २४ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागली होती. या आगीत तीन नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला होता. आग लागण्याच्या आधी तीन वेळा अलार्म वाजला. लाल दिवेही चकाकले. त्यावेळी कक्षात सेवेवर असलेल्या दोन परिचारिका लॉबीत झोपल्या असल्याचे सीसीटीव्ही चित्रिकरणात दिसून येत आहे. स्फोटाचा आवाज ऐकू आल्यानंतर दचकून जागे झालेल्या परिचारिका आरडाओरड करतात, नंतर इतर कर्मचारी धाव घेऊन छोट्या अग्निशमन यंत्राद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात, असे दिसून येत आहे.

आगीवर नियंत्रण मिळवणारी यंत्रणा निकृष्ट

रुग्णालयातील आगीवर नियंत्रण मिळवणारी यंत्रणा निकृष्ट दर्जाची होती, असा आरोप डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे. आग पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी लागली. अग्निशमन दलाचे बंब ३ वाजून ३० मिनिटांनी पोहचले, असा दावा डॉ. देशमुख यांनी केला आहे. आगीसंदर्भात शासनाकडून करण्यात आलेले दावे आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात तफावत आढळून आली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून अनेक बाबी समोर आल्या आहेत. याची स्वतंत्ररीत्या चौकशी झाली पाहिजे, असे डॉ. देशमुख म्हणाले.

अहवाल अजूनही सार्वजनिक नाही

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता राज्‍याचे आरोग्‍यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने अमरावतीत येऊन रुग्‍णालयाची पाहणी केली होती. त्‍याच दिवशी राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानाच्‍या आयुक्‍तांच्‍या अध्‍यक्षतेखाली ११ सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीने चौकशी अहवाल शासनाकडे सादर केला आहे, मात्र हा अहवाल अजूनही सार्वजनिक करण्यात आलेला नाही. हा अहवाल लवकरच समोर येईल. त्यातून विरोधकांची तोंडे बंद होतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकारांशी बोलताना केला होता.