अमरावती: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी झालेल्या २० व्हेंटिलेटरच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असून १३ लाख रुपयांचे व्हेंटिलेटर २२.५ लाख रुपयांत खरेदी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे. सोबतच त्यांनी पुरावेही सादर केले आहेत.
कुणीही यावे, ओरबाडून पैसे खावे
हे व्हेंटिलेटर मोठ्या शहरातल्या या कंपनीचे अधिकृत वितरक किंवा डीलर यांच्या मार्फत खरेदी न करता वाशिम सारख्या छोट्या शहरातील एका पुरवठादाराकडून खरेदी करण्यात आल्याची गंभीर बाब सुद्धा डॉ. सुनील देशमुख यांनी अधोरेखित केलेली आहे. या खरेदीमध्ये जिल्हा नियोजन समिती मधून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यानंतर अधिकारी व प्रशासनाच्या संगनमताने प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचे डॉ. सुनील देशमुख यांचे म्हणणे आहे. कोणत्याही अधिकाऱ्यांनी यावे, ओरबाडून पैसे खावे, हा शिरस्ताच तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.
किमतीत मोठी तफावत
वर्ष २०२५-२६ मध्ये जिल्हा नियोजन समिती (DPDC) मधून उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीमधून जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी तब्बल ४.५ कोटी रुपयांमध्ये हॅमिल्टन सी-३ या कंपनीच्या २० व्हेंटिलेटरची खरेदी करण्यात आली आहे. शासकीय खरेदीमध्ये प्रति व्हेंटिलेटर किंमत ही २२.५५ लाख रुपये दर्शवली आहे. डॉ. देशमुख यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हॅमिल्टन सी-३ व्हेंटिलेटर कंपनीच्या अधिकृत पुरवठादार मार्क इंटरप्राइजेस, नागपूर यांच्याकडून कोटेशन मागवले. तेव्हा एका व्हेंटिलेटरची किंमत ही केवळ १३.१२ लाख रुपये एवढीच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
किमान २ कोटींचा भ्रष्टाचार
या खरेदीमध्ये प्रति वेंटिलेटर अंदाजे १० लाख रुपये इतकी किंमतीमध्ये तफावत असून या २० व्हेंटिलेटरच्या ४.५ कोटी रुपयांच्या खरेदीत किमान २ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे. विना भ्रष्टाचार जर ही खरेदी झाली असती तर एवढ्याच रकमेत तब्बल ४० नग व्हेंटिलेटर म्हणजे दुप्पट संख्येत व्हेंटिलेटर खरेदी करता आले असते आणि जास्त नागरिकांना सुविधा पुरवता आल्या असत्या, असे डॉ. सुनील देशमुख म्हणाले. या पुरवठादाराचे देयक तत्काळ थांबवण्यात येऊन या संपूर्ण खरेदी प्रक्रियेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी द्यावे अशी मागणी डॉ. सुनील देशमुख यांनी केली आहे.
