अमरावती: महाराष्ट्रात अनेक मंदिरे आहेत. जी भारतातच नाही, तर जगात प्रसिद्ध आहेत. या मंदिरांमध्ये देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक दूर दूरुन येतात. देवाच्या चरणी नतमस्तक होता. फुले, हार, नैवैद्य भक्तिभावाने देवाच्या चरणी अर्पण करतात. अनेक मंदिरांची वेगवेगळी रहस्य आपल्याला पहायला मिळतात. अत्यंत पूजनीय देवतांपैकी एक म्हणजे हनुमान. त्यांना धैर्य, भक्ती, शक्ती आणि निःस्वार्थ सेवेचे प्रतीक मानले जाते. अशाच एका हनुमान मंदिराविषयी जाणून घेऊया.

हेमा मालिनी जेव्हा अचानकपणे जहागीरपूरला येतात..

जिल्‍ह्यातील जहागीरपूर येथील श्रीक्षेत्र महारुद्र मारुती देवस्‍थान हे गेल्‍या अनेक दशकांपासून हनुमान भक्‍तांचे श्रद्धास्‍थान ठरले आहे. सुमारे ३० वर्षांपुर्वी प्रख्‍यात अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी या अचानकपणे येथील मंदिरात हनुमानाच्‍या दर्शनाला आल्‍या, तेव्हा मंदिराचा मार्ग कच्चा, खाचखळग्याचा होता. हेमा मालिनी यांच्या पुढाकारातून नंतर या ठिकाणी पक्का पोचमार्ग तयार झाला. त्यासाठी त्यांनी निधीही उपलब्ध करून दिला. १९९१ मध्ये पुन्हा एकदा हेमा मालिनी यांनी या मंदिराला भेट दिली होती. १९९५ मध्ये चित्रपट अभिनेते मनोज कुमार हे देखील जहागीरपूरच्या महारुद्र मारुतीच्या दर्शनाला येऊन गेले.

जहागीरपूरची आख्यायिका काय?

द्वापर युगात प्रभू श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाल्यावर बाळ कृष्णाची भेट घेण्यासाठी श्री हनुमान गेले होते. श्रीकृष्णाची भेट झाल्यावर त्यांनी रुक्मिणी मातेबाबत चौकशी केली. श्रीकृष्णांनी रुक्मिणी माता कुंडीनपूर अर्थात आताचे अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथे असल्याचे हनुमंताला सांगितले होते. त्यामुळे माता रुक्मिणीच्या दर्शनासाठी हनुमंताने कौंडण्यपूर गाठले. रुक्मिणी मातेची भेट झाल्यावर मातेने त्यांना याच परिसरात थांबायला सांगितले. तेव्हापासून श्री हनुमान कौंडण्यपूर जवळील जहागीरपूर येथे आहेत, अशी आख्यायिका सांगितली जाते.

मंदिराची स्‍थापना कशी झाली?

सुमारे साडे चारशे वर्षांपूर्वी मार्डा या गावातील नानासाहेब देशमुख यांचे कौडण्यपूर लगत चौदाशे एकर शेत होते. या शेतात काम करणाऱ्या मजुरांना एक दिवस गवत कापत असताना अचानक विळ्याला रक्त लागलेले दिसले. मजूर आश्चर्यचकित झाले. त्यांनी या प्रसंगाची माहिती देशमुख यांना दिली. यानंतर शेतात खोदकाम करण्यात आले, त्यावेळी जमिनीतून श्री हनुमानाचा भव्य मुखवटा बाहेर निघाला. देशमुख यांच्या शेतात श्री हनुमान प्रकटल्याची माहिती पंचक्रोशीत पसरली अनेक जण या ठिकाणी दर्शनासाठी आले. या जागृत देवस्थानात परराज्यातूनही भाविक येतात.