अमरावती: शहरातील कठोरा नाका परिसर. अत्यंत वर्दळीचा. शहरातील अनेक मोठी महाविद्यालये याच परिसरात. सकाळची वेळ, लोक आपल्या कामावर जाण्याच्या तयारीत असताना अचानक भरधाव वेगातील एक कार रस्त्याच्या कडेला एका औषधी दुकानात शिरते. दुकानाच्या शटरवर आदळते. मोठा आवाज होतो. आजूबाजूचे लोक धाव घेतात. सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झालेली नसते. कारचालकाला बाहेर काढले जाते. ही घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे.

नेमकी घटना काय?

शहरातील कठोरा नाका परिसरात एका भरधाव बलेनो कारच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट ‘आरोग्य भारती मेडिकल स्टोअर्स’ मध्ये शिरल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातामुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कठोरा नाका परिसरातील रस्त्यालगत आरोग्य भारती हे औषधी दुकान आहे. दुकान ज्या व्यापारी संकुलात आहे, तो परिसर रस्त्याच्या पातळीपेक्षा काहीसा खाली असल्याने ही कार दुकानाचे शटर आणि रस्त्याच्या कडेपर्यंत हवेत अडकून पडली.

मोठा आवाज आणि पळापळ

ही कार औषधी दुकानाच्या शटरवर आदळताच मोठा आवाज झाला. दुकानातील कर्मचारी धावतच बाहेर आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर कार अडकून पडल्याने ती बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. अखेर क्रेनच्या माध्यमातून कार सुरक्षितपणे संकुलाच्या परिसरातून बाहेर काढण्यात यश आले. अपघातात मेडिकलचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

कारचालकाला सुखरुप बाहेर काढले

या अपघातानंतर नागरिकांनी कारचालकाला सुखरूप बाहेर काढले. या अपघातात कारचा समोरील भाग चक्काचूर झाला आणि औषधी दुकानाचेही नुकसान झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. कठोरा नाका परिसर हा अत्यंत वर्दळीचा आहे. याच भागात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था आणि इतर महाविद्यालये आहेत. या परिसरात रस्ते रुंद असले, तरी वाहनांच्या अतिवेगामुळे यापुर्वी काही अपघात झाले आहेत. या भागात वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. हा अपघात घडला, त्यावेळी कुणीही कारच्या समोर आले नाही, त्यामुळे सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली.