अमरावती: गेल्या अकरा दिवसांत तीन जणांचे बळी घेणाऱ्या वाघिणीला बेशुद्ध करुन पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात वनविभागाच्या पथकाला यश प्राप्त झाले आहे. शिरजगाव कसबा नजीक सोमवारी दुपारी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर वाघिणीने हल्ला केला होता. त्यात या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने शोधमोहीम तीव्र केली होती. शिरजगाव कसबा येथील एका शेतातून या वाघिणीला जेरबंद करण्यात आले.
वनविभागाच्या पथकाची शोधमोहीम
रविवारी सायंकाळी वाघिणीने चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी येथील शेतशिवारात एका १८ वर्षीय तरूणीवर हल्ला करून तिला ठार केले होते. त्यानंतर ड्रोनच्या सहाय्याने वाघिणीचा शोध सुरू करण्यात आला. वनविभागाचे कर्मचारी वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर वाघिणीला बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन देऊन बंदिस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका शेतात वाघिण थांबून असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला मिळाली होती. पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे पशुवैद्यक डॉ. हेमराज यांनी वाघिणीला यशस्वीपणे डार्ट करून बेशुद्ध केले. त्यानंतर वाघिणीला पिंजऱ्यात टाकण्यात आले.
चोवीस तासांत दोन बळी
चांदूर बाजार तालुक्यात सातपूड्याच्या पायथ्याशी मार्गक्रमण करीत असलेल्या वाघिणीने सोमवारी शिरजगाव कसबा नजीक शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर हल्ला केला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर या वाघिणीने रविवारी सायंकाळी चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी गावालगत १८ वर्षीय युवतीवर हल्ला करून तिला ठार मारले होते. चोवीस तासांत या वाघिणीने दोन बळी घेतले होते.
वाघिणीचा बोर अभयारण्यातून प्रवास
वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातून या वाघिणीने प्रवास सुरू केला होता. मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथे २७ ऑगस्ट रोजी शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर, सुमारे ५० किलोमीटरचा प्रवास करून या वाघिणीने तीन दिवसांपूर्वी रिद्धपूर येथील मौजा नजरपूर शेत शिवारात एका शेतकऱ्याच्या गायीवर हल्ला केला होता. वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्यासाठी वनविभागाचे पथक रात्रभर पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावून दबा धरून बसले होते, पण वाघिणीला तेव्हा जेरबंद करता आले नव्हते.
मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न ऐरणीवर
या घटनांनी मानव वन्यजीव संघर्षाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या काही वर्षांपासून वन विभागात सहायक वनसंरक्षक, वन परिक्षेत्र अधिकारी आणि वनपाल या क्षेत्रीय संवर्गात बदली करिता मोठ्या प्रमाणावर पैसा व राजकीय वशिला आवश्यक झाला आहे, असा आरोप वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेल्फेअर सोसायटी(वॉर) संस्थेचे निलेश कंचनपुरे यांनी केला आहे.
