अमरावती: मेळघाटातील चौराकुंड या गावात एका युवकाला वन गुन्ह्यासंदर्भात ताब्यात घेतल्यानंतर चौकशीसाठी गेलेल्या वनविभागाच्या पथकावर गावकऱ्यांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील धारणी तालुक्यातील चौराकुंड वनपरिक्षेत्रात काही दिवसांपुर्वी चार रानगवे, दोन भेडकी आणि दोन माकडांसह ११ वन्यजीवांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात विषप्रयोग झाल्याची अधिकृत नोंद पशू शल्यचिकित्सकांनी केली आहे. पानवठ्यातील विषारी पाणी पिल्यामुळे या वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याचे कारण समोर आले आहे.
नेमकी घटना काय?
चौराकुंड वनपरिक्षेत्रातील उत्तर अंजन झडप आणि चौराकुंड उत्तर खंड परिसरात जंगलगस्तीदरम्यान वन कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चार रानगवे आणि एक भेडकी मृतावस्थेत आढळून आली होती. नंतर इतर काही वन्यप्राण्यांचे मृतदेह देखील दिसून आले. २२ मे रोजी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. नैसर्गिक पानवठ्यात विषारी द्रव्य मिसळून प्राण्यांना ठार मारण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणात चौराकुंड येथील एका युवकाला अटक करण्यात आली होती. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. या प्रकरणात आणखी सहा युवकांना नोटीस पाठवण्यात आली होती. हे संशयित फरार झाले आहेत. जेव्हा शनिवारी रात्री वन कर्मचारी चौकशीसाठी गावात पोहचले, तेव्हा वन कर्मचाऱ्यांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एका महिला महिलेसह दोन वनरक्षक जखमी झाले आहेत.
पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त, कारवाई
या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही वनरक्षकांना उपचारासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाा आहे. वन विभागाने देखील हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. वन विभागाची पथके गावालगतच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
कारवाईमुळे वनविभागावर रोष
वन कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात युवकाला अटक करण्यात आली आहे. पानवठ्यात विष कालवून वन्यप्राण्यांना ठार मारण्याच्या प्रकरणात एका युवकाला अटक करण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्यातच वनविभागाचे पथक चौकशीसाठी पोहचल्यानंतर दगडफेकीची घटना घडली. रात्रभर पोलिसांचा बंदोबस्त होता, सध्या गावात शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
