अमरावती : सध्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक प्रतिष्ठित कुटुंबातील महिला आणि युवतींचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण गाजत असतानाच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरातही अशाच प्रकारचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. एका १९ वर्षीय युवकाने अनेक अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केले आणि त्यांचे व्हिडिओ, फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असल्या, तरी समाज माध्यमांवरील हे आक्षेपार्ह व्हिडिओ हटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

प्रकरण समोर येताच काय झाले?

समाज माध्यमांवर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित होत असल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहचली होती. दरम्यान, भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची काल भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. दुसरीकडे, भाजपचे अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे हेही अचलपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात धडकले आणि त्यांनी आरोपींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणात सुमारे १८० व्हिडिओ प्रसारित झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

पोलिसांनी केली अखेर कारवाई

या प्रकरणात परतवाडा पोलिसांनी आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याच्या विरोधात पोलीस अंमलदार निलेश काळे यांच्या तक्रारीवरून भारतीयय न्याय संहिता कलम २९४, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कलम ८ व १२ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६७ आणि ६७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आली.

पोलिसांसमोर आव्हान काय?

संबंधित फोटो आणि व्हिडिओमधील मुली प्राथमिकदृष्ट्या अल्पवयीन वाटत असून पीडित मुलींचा आणि पालकांचा शोध घेण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु भीतीपोटी अद्याप कोणतीही पीडित मुलगी किंवा मुलींचे पालक तक्रार देण्यास समोर आलेले नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.

महाराष्ट्र सायबरची मदत

दरम्यान, पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाला दिली असून समाज माध्यमांवर प्रसारित आक्षेपार्ह व्हिडिओ वगळण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली. हे आक्षेपार्ह व्हिडिओ वगळण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. पीडित मुली किंवा त्यांच्या कुटुंबीयांची ओळख समोर येणार नाही, याची पुरेपूर दक्षता पोलिसांकडून घेतली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.