अमरावती: विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीला अवघे ४८ तास शिल्लक असताना काँग्रेसमधील उमेदवारीचा तिढा अजूनही कायमच आहे. आज मंगळवारी रात्री जिल्ह्यातील नगरपालिकांच्या काँग्रेस गटनेत्यांची बैठक बोलावून वास्तव परिस्थिती जाणून घेतल्यानंतर काँग्रेस पक्ष पुढील निर्णय घेईल, असे माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. देशमुख यांनी भाजपवर गंभीर आरोप केले.
उघडपणे सत्तेचा दुरूपयोग
डॉ. सुनील देशमुख म्हणाले, काँग्रेसने देखील यापुर्वी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुका लढवल्या आहेत, पण इतक्या उघडपणे सत्तेचा दुरूपयोग आणि पैशांचे वाटप यापुर्वी कधीही पाहिले नव्हते. लोकशाही व्यवस्थेलाच धक्का पोहचविण्याचा हा प्रकार आहे. महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीच्या राजकारणाची पायाभरणी केली जात आहे, असा आरोप डॉ. देशमुख यांनी केला. भाजपने विरोधी पक्षांच्या उमेदवारांना ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न केला. अमरावतीसह इतर ठिकाणीही हेच प्रकार घडले. यातून भाजपला काय साध्य करायचे आहे, हा प्रश्न आहे, असे डॉ. देशमुख म्हणाले.
डिजीटल प्रचार करता येत नाही
विधान परिषदेची ही निवडणूक अत्यंत गांभिर्यपूर्वक लढवायची असते. ही निवडणूक केवळ डिजीटल पद्धतीने प्रचार करून लढवता येत नाही. उमेदवारी स्वीकारल्यानंतर त्यासाठी आवश्यक तयारी असणे गरजेचे होते. काँग्रेस पक्षाने हर्षजीत देशमुख यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे निवडणुकीच्या निर्णायक टप्प्यावर उमेदवार अनुपस्थित राहणे, ही गंभीर बाब असल्याचे डॉ. सुनील देशमुख यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख हे प्रचाराच्या मुख्य टप्प्यात रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्थानिक काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
काँग्रेस तटस्थ राहण्याची शक्यता
या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अद्यापही भूमिका जाहीर केली नाही, तरी काँग्रेसच्या गटनेत्यांशी आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले आहे. काँग्रेसचे उमेदवार संपर्काबाहेर असल्याने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना काँग्रेसकडून पाठिंबा दिला जाऊ शकलो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती, पण काँग्रेसच्या काही अटी वंचित बहुजन आघाडीला मान्य नसल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज दुपारी झालेल्या बैठकीला खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख आदी उपस्थित होते.
