अमरावती : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. परभणी-हिंगोली मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातर्फे प्रबळ दावेदार असलेल्या माजी आमदार विप्लव बाजोरिया यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी अमरावतीत धाव घेऊन अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे आता महायुतीत धुसफूस होण्याची चिन्हे आहेत. अमरावतीतून भाजपतर्फे प्रवीण पोटे हे निवडणूक लढत आहेत.

कोण आहेत विप्लव बाजोरिया?

विप्लव बाजोरिया हे २०१८ मध्ये परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विप्लव बाजोरिया यांना दुसऱ्यांदा उमेदवारीचा शब्द दिल्याचा दावा बाजोरिया समर्थकांनी केला होता. पण, महायुतीकडूनच त्यांच्यात उमेदवारीला विरोध सुरू झाला होता. शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर हेही उमेदवारीच्या स्पर्धेत होते. पण, त्यांनी माघार घेतली. ऐनवेळी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना उमेदवारी मिळाली, त्यामुळे विप्लव बाजोरिया यांचा भ्रमनिरास झाला.

काय म्हणाले, विप्लव बाजोरिया?

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विप्लव बाजोरिया यांनी सांगितले की, मी हिंगोली-परभणीचा आमदार होतो. पण, यावेळी अमरावतीत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, अशी इच्छा येथील नगरसेवक असलेल्या मतदारांनी व्यक्त केली होती. त्यामुळे मी येथून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. या निवडणुकीत पक्षाचा संबंध नाही. मी थेट मतदारांच्या संपर्कात आहे. रवी राणांचा आपल्या उमेदवारीला पाठिंबा आहे का, असे विचारले असता, राजकारणात असे काही चालत असते, पण मी अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहे. नगरसेवकांच्या आग्रहाखातर मी उमेदवारी दाखल केली आहे.

उमेदवारी कायम ठेवणार का?

विप्लव बाजोरिया आपली उमेदवारी कायम ठेवणार का, असा प्रश्न चर्चेत आला आहे. ते रिंगणात कायम राहिल्यास ही निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हे आहेत. भाजपतर्फे प्रवीण पोटे आणि काँग्रेसतर्फे हर्षजीत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बाजोरिया यांच्या उमेदवारीने या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. आधीच युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या नाराजीमुळे महायुतीत धुसफूस सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. विप्लव बाजोरिया यांच्या बंडखोरीने त्याला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. महायुतीला यातून मार्ग काढावा लागणार आहे.