scorecardresearch

सामान्‍य प्रवाशांवर मुंबई एक्‍स्‍प्रेसच्‍या तिकिटांचा तिप्‍पट भार

१५ जूनपासून हे बदल लागू करण्‍यात येत असल्‍याने अमरावती-मुंबई एक्‍स्‍प्रेसमधून सर्वसामान्‍यांचा प्रवास महागणार आहे.

सामान्‍य प्रवाशांवर मुंबई एक्‍स्‍प्रेसच्‍या तिकिटांचा तिप्‍पट भार
(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता

अमरावती : सर्वसामान्‍यांची रेल्‍वे अशी ओळख बनलेल्‍या १२११२ क्रमांकाच्‍या अमरावती – मुंबई एक्स्प्रेसच्या डब्‍यांच्‍या रचनेत बदल करण्‍याचा निर्णय मध्‍य रेल्‍वेने घेतला असून सामान्य प्रवाशांवर तिकीटांचा तिप्पट भार पडणार आहे. नव्या रचनेत शयनयान डब्यांची (स्‍लीपर) संख्या घटवण्यात आली असून वातानुकूलित (एसी) डब्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. १५ जूनपासून हे बदल लागू करण्‍यात येत असल्‍याने अमरावती-मुंबई एक्‍स्‍प्रेसमधून सर्वसामान्‍यांचा प्रवास महागणार आहे. प्रवाशांनी या निर्णयावर रोष व्‍यक्‍त केला आहे.

हेही वाचा >>> चक्क स्मशानभूमीत रंगणार होलिकोत्सव; जाणून घ्या कुठे ते…

अमरावती- मुंबई एक्‍स्‍प्रेसचे २२ एप्रिलपर्यंतचे आरक्षण पूर्ण झाले आहे. अनेक प्रवाशांची तिकिटे प्रतीक्षायादीत आहेत. या एक्‍स्‍प्रेसमध्‍ये सुरूवातीपासून शयनयान डब्‍यांची संख्‍या ९, वातानुकूलित तृतीय श्रेणीचे चार, वातानुकूलित द्वितीयचे दोन तर एक प्रथम श्रेणीचा डबा जोडलेला असतो. नव्‍या रचनेत १५ जूनपासून या एक्‍स्‍प्रेसमधील सात शयनयान डबे कमी करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असून या एक्‍स्‍प्रेसमध्‍ये आता शयनयानचे केवळ दोनच डबे राहणार आहेत. त्‍याऐवजी वातानुकूलित डब्‍यांची संख्‍या वाढवण्‍यात येणार आहे.

हेही वाचा >>> गोंदिया: आमची केंद्रात ४०० प्लस आणि राज्यात २०० प्लसची तयारी पाहून विरोधक घाबरलेले; बावनकुळे

अमरावती-मुंबई एक्‍स्‍प्रेसचे शयनयान प्रवासाचे भाडे ४०५ रुपये आहे, तर वातानुकूलित द्वितीय श्रेणीच्‍या प्रवासासाठी १४९० आणि तृतीय श्रेणीसाठी १०६० रुपये मोजावे लागतात. आता शयनयान डब्‍यांची संख्‍या कमी होणार असल्‍याने प्रवाशांना तिप्‍पट भार सोसावा लागणार आहे. त्‍याचे परिणाम आतापासूनच जाणवायला लागले असून १५ जूनच्‍या आरक्षण स्थितीनुसार आता शयनयानच्‍या केवळ २१ जागा (बर्थ) उपलब्‍ध असून वातानुकूलित तृतीय श्रेणीच्‍या तब्‍बल ३१४ जागा शिल्‍लक आहेत. सामान्‍य प्रवाशांना आता नाईलाज म्‍हणून वातानुकूलित डब्‍यामधून प्रवास करावा लागणार आहे. एका शयनयान डब्‍यात एकूण ८० जागा असतात सद्यस्थितीत एकूण ७२० जागा उपलब्‍ध असताना नव्‍या रचनेत केवळ १६० प्रवाशांना शयनयानची तिकिटे उपलब्‍ध होऊ शकतील. मुंबईला उपचारासाठी जाणा-या रुग्‍णांचे, ज्‍येष्ठ नागरिकांचे हाल होणार आहेत. महानगर यात्री संघाने मध्‍य रेल्‍वेच्‍या या निर्णयाला विरोध दर्शवला असून रचनेत बदल न करता त्‍याऐवजी नवीन संपूर्ण वाताकुलित एक्‍स्‍प्रेस सुरू करावी अशी मागणी केली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 16:48 IST