अमरावती : अमरावती महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजपचे उमेदवार श्रीचंद तेजवानी यांच्या बाजूने मतदान करून एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांना देखील पाठिंबा दिला. या निवडणुकीत एमआयएमने तठस्थ राहण्याची भूमिका घेतली असताना मीरा कांबळे यांनी भाजपला दिलेला पाठिंबा चर्चेत आला. आता या एका मतावरून महायुतीतील विसंवाद उघड झाला आहे.
युवा स्वाभिमान पक्षाने मीरा कांबळे यांच्या पाठिंब्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. युवा स्वाभिमानच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले आहे. मीरा कांबळे यांचे चिरंजीव संदीप कांबळे हे गेल्या २० वर्षांपासून युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आहेत. बडनेरा जुनी वस्ती प्रभागाचा सर्वांगिण विकास करायचा असेल, तर मजबूत नेतृत्व आणि विकासाभिमूख विचारसरणीची गरज आहे. भाजपचे महापौर आणि युवा स्वाभिमान पक्षाचे उपमहापौर हे शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असून त्यामुळेच मीरा कांबळे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे युवा स्वाभिमान पक्षातर्फे सांगण्यात आले आहे.
मीरा कांबळे यांनी एमआयएमला रामराम ठोकल्याने जुनी वस्ती परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मीरा कांबळे आणि त्यांचे पुत्र संदीप कांबळे हे गेल्या दोन दशकांपासून युवा स्वाभिमान पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे, असेही युवा स्वाभिमान पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
भाजपने विरोध दर्शवला
अमरावती महापालिकेत महापौर निवडणुकीसाठी भाजप- महायुतीजवळ पुरेसे बहुमत होते. ज्या मित्रपक्षांनी भाजप सोबत यावे, असे वाटत होते त्यांच्याशी भाजप नेतृत्वाने रीतसर संपर्क साधला होता. पराभव झाला तरी चालेल पण आम्हाला एमआयएमचे मत नको अशीच आमची भूमिका आहे. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रश्नच नाही. महायुतीकडून अन्य कोणी एमआयएमच्या सदस्यांशी बोलल्याचा दावा करत असेल तर तो त्यांना लखलाभ असो. आम्ही एमआयएमला सोबत घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असा दावा भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे नाव न घेता शिवराय कुळकर्णी यांनी या घडामोडींविषयी नापसंती व्यक्त केली आहे. भाजप आणि महायुतीजवळ निवडणूक जिंकण्यासाठी पुरेसे संख्याबळ होते, त्यामुळे एमआयएमला सोबत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महायुतीतील इतर पक्षाने तो प्रयत्न केला असेल, तर भाजपला काहीही घेणेदेणे नाही, असे कुळकर्णी यांनी म्हटले आहे.
