अमरावती: मोर्शी मार्गावर नांदगावपेठ नजीक अमरावती शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी गुरूवारी अचानक फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. उच्च दाबाने जलवाहिनीतून पाणी बाहेर रस्त्यावर फेकल्या जात असल्याने वाहनचालकांना या रस्त्यावरून जाणे अवघड झाले होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. फुटलेल्या जलवाहिनीतून उंच फवारे उडत होते. त्यामुळेच वाहतुकीवर परिणाम झाला होता.

पाणी पुरवठा विस्कळीत

अप्पर वर्धा धरणावरून अमरावती शहराला याच मुख्य जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला जातो. हीच जलवाहिनी फुटल्याने अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहचले. संबंधित यंत्रणांच्या मदतीने जलवाहिनी दुरूस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरच पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकेल.

गेल्या महिन्यातही फुटली होती जलवाहिनी

गेल्या महिन्यात देखील डवरगाव नजीक मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यावेळी थकित देयकांसाठी कंत्राटदारांनी संप पुकारला होता. त्यामुळे दुरूस्तीच्या कामात खोळंबा निर्माण झाला होता. पण, त्यानंतर कंत्राटदारांच्या सहकार्याने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले, पण अमरावतीकरांना दोन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. जलवाहिनी फुटल्यानंतर साधारणपणे दोन दिवस दुरूस्तीला लागतात. यावेळी आता किती वेळ लागणार, याचा अंदाज बांधला जात आहे.

जलवाहिनी वारंवार का फुटते?

अमरावती आणि बडनेरा या शहराला पाणीपुरवठा करणारी अप्पर वर्धा धरण मोर्शी ते नेरपिंगळाईपर्यंतची डब्लूटीपी जलवाहिनी जुनी लोखंडी असून जीर्ण झाली आहे. या गुरुत्ववाहिनीचे ३० वर्षांचे आयुष्यमान संपुष्टात आल्याने वारंवार गळती होते. एक गळती दुरुस्तीसाठी चार ते पाच दिवस लागते. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत गैरसोय निर्माण होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे सध्या शहराला दिवसाआड आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. त्यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारची ‘अमृत-२’ ही योजना मंजूर झाली आहे.

काम कुठपर्यंत आले आहे?

जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने आमदार सुलभा खोडके यांनी पाठपुरावा केल्यानंतर ८६५ कोटी रुपयांची योजना मंजूर झाली. जुनी जलवाहिनी बदलण्यासाठी नवीन पाईप आणले गेले आहेत. ते सध्या रस्त्याच्या कडेला पडून आहेत. हे काम केव्हा पूर्ण होईल, याची प्रतीक्षा अमरावतीकरांना आहे.