मुंबई : अमरावती येथील नवसारी येथे भव्य क्रीडा संकुल येथे १६ हजार ७०८ चौरस मीटर जागा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अमरावती महापालिकेला ही जागा क्रीडासंकुलासाठी विनामूल्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
नवसारी येथील या जागेवर विकास योजनेअंतर्गत ‘खेळाचे मैदान’ असे आरक्षण होते आणि त्याचा आगाऊ ताबा महापालिकेला देण्यात आला होता. मात्र महापालिकेने या जागेवर पूर्वपरवानगीशिवाय त्रयस्थांसोबत करार करून क्रीडा संकुल विकसित केले आणि काही क्षेत्रावर (१८७८.८० चौ.मी.) वाणिज्य वापर सुरू केला होता. या शर्तभंगामुळे शासनाच्या नियमांनुसार या जागेचे अकृषिक दराने होणारे मूल्यांकन १० कोटी ९० लाख १९ हजार ७०० रुपये आणि २०११ पासूनच्या वाणिज्य वापरापोटीचे व्याज ३ कोटी ५६ लाख २१ हजार ८६२ रुपये, अशी एकूण १४ कोटी ४६ लाख ४१ हजार ५६२ रुपयांची रक्कम शासनाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते.
अमरावती महानगरपालिकेची सध्याची आर्थिक स्थिती बेताची असून कर्मचाऱ्यांची देणी व कंत्राटदारांची थकीत देयके असे जवळपास ३५० कोटींचे दायित्व महापालिकेवर आहे. महापालिकेच्या स्वउत्पन्नातून एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नसल्याचे महापालिका आयुक्तांनी शासनाला कळवले होते. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात आली. वाणिज्य वापरामुळे आकारण्यात आलेले ३ कोटी ५६ लाख रुपयांचे व्याज पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. सदर आरक्षणास नगर विकास विभागाची मान्यता प्राप्त होण्याच्या अधीन राहून ही जागा महापालिकेला प्रदान करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. अमरावती शहरासाठी क्रीडांगण ही आवश्यक होते. या ठिकाणी तयार झालेले अनेक खेळाडू देश आणि जगभरात लौकिक मिळवत आहेत. त्यामुळे सामाजिक हित आणि खेळाडूंची गरज लक्षात घेऊन या क्रीडांगणासाठी शासकीय जागा महापालिकेस विनामूल्य देण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
