अमरावती: एका अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर तिचे नवजात बाळ साडेतीन लाख रुपयांत विकण्याचा कथित प्रयत्न, पोलिसांनी या प्रकरणी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैशाली भोजने आणि तिचा पती प्रफुल भोजने यांच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा, प्रफुल भोजने हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख, तर ध्वनिफितीच्या माध्यमातून हे प्रकरण शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी वर्षा भोयर आणि कोमल बद्रे यांनी उघडकीस आणलेले. दुसरीकडे, भोजने दाम्पत्य फरार आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अजूनही कायम आहे.

नेमकी घटना काय?

डॉ. वैशाली भोजने यांच्‍या रुग्णालयात एका नवजात बालकाचा साडेतीन लाख रुपयांत व्यवहार झाल्याची ध्वनिफित शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका वर्षा भोयर आणि युवती सेनेच्या जिल्हाध्यक्ष कोमल बद्रे यांनी समोर आणली होती. डॉ. भोजने यांच्या रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली होती. तिच्या बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात अखेर पोलिसांनी डॉ. वैशाली भोजने, तिचा पती प्रफुल भोजने आणि अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर भोजने दाम्पत्य फरार आहे. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. पण, या संपूर्ण प्रकरणात भोजने दाम्पत्याची भूमिका काय होती, यापुर्वीही अशी प्रकरणे घडली होती का, हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ध्वनिफितीत काय संवाद आहे?

एका नवजात बाळाची साडेतीन लाख रुपयांत कथित विक्री होत असल्याची ध्वनिफित शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी वर्षा भोयर आणि कोमल बद्रे यांनी सार्वजनिक केली होती. ‘बाळाच्या व्यवहारात एक रुपयाही कमी होणार नाही आणि आम्ही सर्व मॅनेज करून जन्म दाखला देखील मिळवून देऊ’, असे संभाषण त्यात होते. या प्रकरणातील पीडिता ही १७ वर्षे ४ महिने वयाची असून तिच्यावर मातृत्व लादणारा तिचा प्रियकर हा अवघा १६ वर्षे ६ महिन्यांचा आहे. या प्रकरणात वर्षा भोयर आणि कोमल बद्रे यांचे सविस्तर जबाब फ्रेजरपुरा पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. आरोपी डॉक्टरच्या अटकेनंतर आवाजाचे नमुने देखील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. त्यांच्या रुग्णालयाला टाळे ठोकण्यात आले आहे.

राजकीय सहभागामुळे आरोप?

शिवसेना शिंदे गटाने केलेले आरोप आणि त्यात आरोपी प्रफुल भोजने हा उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी, त्यामुळे या प्रकरणात भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनीही भाष्य केले. प्रफुल भोजने आणि डॉ. वैशाली भोजने या दाम्पत्याने यापूर्वी अशी किती प्रकरणे केली ? दत्तक देण्याच्या नावाखाली किती बाळांना विकले? किती जणांचे अवैधरित्या गर्भलिंग निदान केले? अवैधरित्या किती गर्भपात घडवून आणले? या सगळ्यांचा तपास यानिमित्ताने अमरावतीच्या पोलिसांनी केला पाहिजे, अशी मागणी कुळकर्णी यांनी केली. तर, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतरच प्रफुल भोजने हा उद्धव ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याचे आपल्याला समजल्याचे वर्षा भोयर यांचे म्हणणे आहे. पण, या संपूर्ण प्रकरणातील राजकीय सहभागामुळे हे प्रकरण गुंतागुंतीचे बनले आहे.