अमरावती : फळ पीकविमा काढून देण्याच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. त्यांचे २ लाख २७ हजार ३८४ रुपये लुबाडण्यात आले. त्यांना खोट्या संगणकीकृत पावत्या देण्यात आल्या. ही घटना वरूड ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अमोल चरणदास क्षीरसागर (३०) रा. शिवाजीनगर, वरूड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमोलने टेंभुरखेडा येथील रहिवासी नीलेश दिनेश देशमुख (३९) यांना पीकविमा काढून देतो, असे म्हणून त्यांच्याकडून पैसे उकळले. सोबतच अमोलने अन्य शेतकऱ्यांनाही पीकविमा काढून देण्याच्या नावावर त्यांच्याकडून पैसे लुबाडले. अशाप्रकारे अमोलने नीलेश देशमुख व अन्य शेतकऱ्यांकडून एकूण २ लाख २७ हजार ३८४ रुपये घेतले. त्यानंतर अमोलने नीलेश देशमुखसह अन्य शेतकऱ्यांना खोट्या संगणकीकृत पावत्या दिल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नीलेश देशमुख यांनी वरूड ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेही वाचा >>>अनिल देशमुखांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आव्हान, म्हणाले ” त्यांनी माझ्या विरूद्ध लढावे”
युवतीची टिंगल करीत काढला व्हिडीओ
रस्त्यावर पडलेली दहा रुपयांची नोट उचलण्याकरिता वाकलेल्या एका अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ काढण्यात आला. ती नोट पडली नव्हती, तर टिंगल करण्यासाठी असे करण्यात आल्याचे मुलीच्या लक्षात आल्यानंतर व्हिडीओ काढणाऱ्यांनी तिच्याकडे पाहून शेरेबाजी केली. ही घटना कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील एका धार्मिक स्थळाजवळ घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून अनोळखी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित अल्पवयीन मुलगी ही भाजीपाला आणण्याकरिता राजकमल ते राजापेठ मार्गावरील एका धार्मिक स्थळाजवळील हातगाडीवर जात होती. त्यावेळी तिला रस्त्यावर दहा रुपयांची नोट पडलेली दिसली. नोट उचलण्याकरिता ती वाकली. त्याचवेळी धाग्याने बांधलेली ती नोट अज्ञात व्यक्तीने ओढली. त्यामुळे तिने झाडाच्या मागे पाहिले. त्यावेळी एक काळा टी-शर्ट घातलेली व्यक्ती तिला दिसली. त्याच्यासोबत अन्य तिघे बसले होते. ते तिला पाहून हसले. त्याचवेळी त्यातील एक जण तिचा व्हिडीओ काढताना दिसला. त्याकडे दुर्लक्ष करीत ती भाजीपाला घेण्याकरिता हातगाडीवर गेली. भाजीपाला घेऊन ती परत जात होती. त्यावेळी एका दवाखान्यासमोर तिला पुन्हा दहा रुपयांची नोट रस्त्यावर पडून असलेली दिसली. आधीच्या मुलांनीच पुन्हा तो प्रकार केला. त्यांनी तिच्याकडे पाहून शेरेबाजी केली. तिने मोबाइलवरून आई-वडिलांना घडलेली घटना सांगितली. नंतर कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली.