अमरावती : अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील फोटो व व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्याच्या प्रकरणात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील आरोपी अयान अहमद याच्या घरावर आज ‘बुलडोजर’ कारवाई करण्यात आली. त्याच्या घराचा काही भाग अतिक्रमित असल्याने नगर परिषदेने घराचा जीना तोडून टाकला. या कारवाईदरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला हेाता. लोकांनीही गर्दी केली होती.
नेमके काय घडले?
आज दुपारी अचलपूर नगर परिषदेचे पथक बुलडोजर घेऊन आरोपीच्या घरासमोर पोहचले. जेसीबीच्या माध्यमातून घराच्या बाजुला लावण्यात आलेला लोखंडी जिना तोडण्यात आला. कारवाई दरम्यान भाजपचे आमदार प्रवीण तायडे स्वत: हजर होते. कारवाईदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि नागरिकांची देखील मोठी गर्दी झाली होती. अशा प्रकारे बुलडोजरच्या सहाय्याने कारवाई करण्याची अचलपूरमधील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.
अतिक्रमणाबाबत नोटीस
अचलपूर नगरपरिषदेकडून संबंधित घरावरील अतिक्रमणाबाबत तपास केल्यानंतर, काही भाग बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर नगरपरिषदेने आरोपीच्या कुटुंबाला अतिक्रमणासंदर्भात नोटीस बजावल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार आज बुलडोझरद्वारे कारवाई करण्यात आली. दरम्यान, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आरोपीच्या घराजवळ पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये.
प्रकरणामागे मोठे रॅकेट
दरम्यान, या प्रकरणामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. खासदार अनिल बोंडे यांनी आरोपी एमआयएमचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करत ही केवळ एका व्यक्तीची बाब नसून संघटित टोळी काम करत असल्याचा दावा केला आहे. स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअॅपवर गट तयार करून हे जाळे पसरवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच चिखलदरा परिसरातील हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास या रॅकेटचा मोठा खुलासा होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
आरोपीची चौकशी सुरू
आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने समाज माध्यमांवरील प्रसारित व्हिडिओ, फोटो हटविण्याचे काम सुरू केले आहे. ज्यांनी हे व्हिडिओ डाउनलोड केले, त्यांच्याकडून ते पुन्हा समाज माध्यमांवर प्रसारित होण्याचा धोका आहे. पोलीस अशा पोस्टवर नजर ठेवून आहे, आरोपीला गुन्ह्यात कुणी मदत केली असल्यास, त्याचा शोध घेऊन त्यालाही अटक केली जाईल अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली आहे.
