अमरावती : एका १९ वर्षीय युवकाने अनेक अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केले आणि त्यांचे व्हिडिओ, छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी मोठी टोळी कार्यरत असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी मागणी भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.

फोन कॉल्सची तपासणी व्हावी

डॉ. अनिल बोंडे म्हणाले, परतवाडा पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असली, तरी हे काम एका मुलाचे काम नाही, मी स्वत: दोन नावे पोलिसांना दिली आहेत. परंतु ही एक मोठी टोळी आहे. त्यांनी स्नॅपचॅट आणि व्हाट्सॲपच्या माध्यमातून विविध गट तयार करून हे जाळे विणले आहे. हे रॅकेट अत्यंत खोलवर पसरले असून, यात सहभागी मुलांचे मोबाइर्ठल जप्त करून त्यांच्या फोन कॉल्सची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

हॉटेल्सचे सीसीटीव्ही तपासा

गेल्या सहा महिन्यातील परतवाडा आणि चिखलदरा येथील हॉटेल्समधील सीसीटीव्ही चित्रिकरण तपासल्यास या रॅकेटचा पर्दाफाश होऊ शकतो, असे सांगून डॉ. अनिल बोंडे यांनी पोलिसांना तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. या पीडित मुलींमध्ये हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही समाजातील मुलींचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘एसआयटी’ स्थापन करण्याची मागणी

हे प्रकरण तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे आणि संवेदनशील असल्याने याच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी डॉ. बोंडे यांनी केली आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी परतवाडा येथे पोलीस निरीक्षकांची भेट घेतली.

संशयितांचे राजकीय संबंध

आरोपीशिवाय आणखी दहा ते बारा जण या रॅकेटमध्ये सामील असून त्यांनाही पोलिसांनी तत्काळ शोधले पाहिजे. यातील काही संशयित आरोपींचे राजकीय नेत्यांशी नातेसंबंध आहेत. ते पोलिसांनी तपासले पाहिजे. शंभराहून अधिक युवतींचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची विनंती पोलीस निरीक्षकांकडे केली. आम्ही काही पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. कुठल्याही प्रकारचे मानसिक दडपण येऊ न देता आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार नोंदवली पाहिजे, अशी पीडित तरुणींची समजूत घातली, अशी माहिती शिवराय कुळकर्णी यांनी दिली आहे.