अमरावती : जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणी सहायक पोलीस अधीक्षक तथा अचलपूर येथील पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. शुभम कुमार यांच्या नेतृत्वात १० पोलीस अधिकारी आणि ३६ अंमलदाराचे स्वतंत्र विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
कशा पद्धतीने तपास करणार?
परतवाडा शहरात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण आणि त्यानंतर त्यांचे व्हिडिओ, छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित केल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. या प्रकरणात अद्यापही पीडित मुली किंवा त्यांच्या पालकांपैकी कुणीही तक्रार करण्यास समोर आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास जलद गतीने आणि पारदर्शक व्हावा, यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक गठित करण्याचे आदेश ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिले आहेत. तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत शक्यतो इतर कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये. पथकाने गुन्ह्याचा तपास त्वरित आणि जलद गतीने पूर्ण करावा, असे आदेशात म्हटले आहे.
पथकात एकूण १० अधिकारी
विशेष तपास पथक प्रमुख डॉ. शुभम कुमार यांच्यासह तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्यासह १० पोलीस अधिकारी आणि ३६ अंमलदारांचा या पथकात समावेश आहे. हे गंभीर प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी केली होती. आता या प्रकरणाच्या तपासाला गती येण्याची शक्यता आहे.
पोलीस तपास सुरू
तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईलमधून मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओ आढळल्याची माहिती मिळत आहे. हे व्हिडिओ इतर साथीदारांना पाठवले गेले का, याचा शोध घेतला जात आहे. काही व्हिडिओ समाज माध्यमांवर आधीच प्रसारित झाल्याचेही समोर आले आहे. पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात आरोपींनी मोबाईलमधील डेटा डिलीट केला असला, तरी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तो पुन्हा मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आरोपींनी प्रेमाच्या बहाण्याने मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर येत असून, हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
