अमरावती: समाज माध्यमांद्वारे अल्पवयीन मुलींशी जवळीक साधून त्यांची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या एका १९ वर्षीय तरूणाला परतवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अयान अहमद तन्वीर अहमद असे या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्यावर ‘पोक्सो’सह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात १८० हून अधिक मुलींचे व्हिडिओ प्रसारीत करण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
नेमकी घटना काय?
परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही मुलींचे आणि एका तरूणाचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी अयान अहमद याने विविध मुलींशी ओळख वाढवून त्यांच्या इच्छेविरूद्ध अश्लील चित्रीकरण केले आणि ते फोटो-व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
प्राथमिक तपासात पीडित मुली या अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अंमलदार निलेश काळे यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी आरोपी विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाा आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
पीडितांना मदतीचे आवाहन
बदनामीच्या भीतीपोटी अद्याप कोणतीही पीडित मुलगी किंवा तिचे पालक तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना सहकार्याचे आवाहन केले आहे. पीडित मुलींची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. त्यांना समुपदेशनासह सर्व कायदेशीर मदत दिली जाईल, तरी अशा प्रवृत्तींना शिक्षा होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यलयातर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह पोस्टला प्रतिसाद देऊ नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. अनिल बोंडेंनी दिली तक्रार
समाज माध्यमांद्वारे अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याची मागणी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी काल ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना दिलेल्या निवेदनातून केली होती. दुसरीकडे, अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी पोलीस उपविभागीय कार्यालयात जाऊन आरोपीच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणात १८० हून अधिक मुलींचे व्हिडिओ असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे.
