scorecardresearch

अमरावती पोलीस आयुक्तांची चौकशी व्हावी : नवनीत राणा

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देणाऱ्या काही लोकांना धमक्या मिळाल्या आहेत.

navneet rana
खासदार नवनीत राणा (संग्रहीत छायाचित्र)

अमरावती : उमेश कोल्हे हत्या प्रकरण तब्बल बारा दिवस दडपण्याचे काम अमरावती पोलिसांनी केले असून जेव्हा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) अमरावतीत दाखल झाली, तेव्हा नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याने उमेश कोल्हे यांची हत्या झाल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांचीही केंद्रीय यंत्रणेने चौकशी करावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

नवनीत राणा रविवारी रात्री मुंबईहून अमरावतीत पोहचल्या. त्यांनी कोल्हे कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर आरोप केले. दहा-बारा दिवसांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यांच्याच कार्यकाळात अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. या हत्येत कट्टरवादी विचारसरणीच्या लोकांचा सहभाग असतानाही पोलिसांनी आणि तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही घटना दडपण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ‘एनआयए’कडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला, तेव्हा पोलिसांनी तथ्य समोर आणले. राज्यात आता हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आले आहे, त्यामुळे कोल्हे कुटुंबाला निश्चितच न्याय मिळेल, असा आशावाद नवनीत राणा यांनी व्यक्त केला.

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देणाऱ्या काही लोकांना धमक्या मिळाल्या आहेत. त्यांना माफी मागण्यास भाग पाडण्यात आले. हे लोक दहशतीत आहेत. पोलिसांनी त्याचीही दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, असेही नवनीत राणा म्हणाल्या.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amravati police commissioner should be questioned navneet rana amy

ताज्या बातम्या