अमरावती: पुणे येथे नुकत्याच घडलेल्या विषारी दारू प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असताना अमरावती शहर पोलिसांनी अत्यंत सतर्कता बाळगत अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांवर वज्रप्रहार केला आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या थेट आदेशानंतर अमरावती शहर गुन्हे शाखेने शनिवारी एकाच दिवशी शहराच्या विविध भागात विशेष मोहीम राबवून गावठी हातभट्टी दारूचे अड्डे उध्वस्त केले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागेवरच नष्ट केला आहे.

दंगल नियंत्रण पथकासह ४३ जणांची फौज मैदानात

पुण्याच्या घटनेनंतर स्थानिक पातळीवर अशा प्रकारच्या अवैध दारूची निर्मिती रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष पथक तैनात केले होते. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्यासह ४ अधिकारी, ३८ अंमलदार आणि दंगल नियंत्रण पथकाच्या ११ अंमलदारांनी एकत्रितपणे या मोहिमेत सहभाग घेतला. नांदगावपेठ आणि फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारधी बेड्यांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले.

नांदगावपेठ हद्दीत १.४७ लाखांचा मुद्देमाल नष्ट

नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेंदोळा (बु) येथील पारधी बेड्यावर पोलीसांनी छापा टाकला. येथे हातभट्टीवर अवैध दारून तयार करताना सुभाष भोसले (वय ६३), जग्गा पवार (वय ६०) आणि एका ५१ वर्षीय महिलेला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एकूण ४५० लिटर गावठी हातभट्टी दारू, १७०० लिटर मोहमास सडवा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या हद्दीत एकूण १.४७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला.

फ्रेजरपुरा हद्दीत पाच ठिकाणी छापे

फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखने आणखी मोठी कारवाई केली. येथील राजुरा पारधी बेडा, भारत नगर आणि परिहारपुरा वडाळी भागात छापे टाकरण्यात आले. राजुरा पारधी बेड्यांवरून तीन महिलांना ती भारत नगरमधून दोन आरोपींना दारू तयार करताना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत २८६० लिटर मोहमास सडवा, ७३० लिटर तयार गावठी दारू आणि भट्टयांचे साहित्य असा एकूण २ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एकूण जप्त साठा आणि गुन्हे दाखल

या संपूर्ण मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेने दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून ४५६० लिटर मोहमास सडवा आणि ११८० लिटर तयार गावठी हातभट्टी दारू जप्त केली. हा सर्व बेकायदा साठा आणि भट्ट्यांचे साहित्य जागीच नष्ट करण्यात आले.