अमरावती: शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य बच्चू कडू आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्यातील राजकीय संघर्षाला आता नवे वळण मिळण्याचे संकेत आहेत. रवी राणा यांचे कट्टर समर्थक नीलेश भेंडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला. हा राणा समर्थकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राजकीय संघर्ष जुनाच
आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील राजकीय वैर जुने असले, तरी लोकसभा निवडणुकीच्या बच्चू कडू यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हा संघर्ष अधिक तीव्र झाला. भाजपतर्फे निवडणूक लढवत असलेल्या नवनीत राणा यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवासाठी बच्चू कडू यांचा हातभार लागल्याचा आक्षेप राणा समर्थकांनी घेतला होता. तेव्हापासून दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय द्वंद्व सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अधून मधून झडतच असतात. पण गेल्या काही दिवसांपासून या आघाडीवर शांतता असताना बच्चू कडू यांनी राणांचे कट्टर समर्थक असलेले निलेश भेंडे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन कुरघोडी केल्याचे मानले जात आहे.
पक्ष संघटनेच्या विस्ताराचा प्रयत्न
पश्चिम विदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढवण्याची जबाबदारी बच्चू कडू यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून बच्चू कडू यांनी विविध राजकीय पक्षातील प्रभावशाली नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. नीलेश भांडे हे रवी राणा यांचे कट्टर कार्यकर्ते होते. अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर हल्ला देखील झाला होता.
रवी राणा काय उत्तर देणार?
या नवीन घडामोडींविषयी रवी राणा यांनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केली नसली, तरी बच्चू कडू यांचा डाव ते कशा पद्धतीने परतवून लावणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात ताणली गेली आहे. विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. महापालिका आणि नगरपालिकांचे सदस्य हे मतदार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. या मतदारांवर बच्चू कडू आणि रवी राणा कशा पद्धतीने प्रभाव टाकणार, त्याचा निवडणुकीवर परिणाम काय होणार याची चर्चा सध्या रंगली आहे. जुना इतिहास पाहता या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष अधिकाधिक तीव्र होत जाणार आहे. हे दोन्ही नेते विशेष म्हणजे महायुतीच्या घटक पक्षांचे मोठे नेते आहेत.
