अमरावती: फासेपारधी समाजातील वंचित मुला-मुलींसाठी संघर्षातून सुरू केलेल्या प्रश्नचिन्ह या आश्रमशाळेसमोरील प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. वेळोवेळी आंदोलने करून, शासन-प्रशासनाचे लक्ष वेधून देखील मागण्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे या आळमशाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे आणि प्रकल्पाच्या मार्गात आल्यामुळे प्रश्नचिन्ह आश्रमशाळेची इमारत बुलडोझर फिरवून जमीनदोस्त करण्यात आली. इमारत पाडल्यानंतरही शाळेचे संस्थापक मतीन भोसले यांनी संघर्ष सुरू ठेवला. वंचित मुलांच्या शिक्षणाचा प्रवाह थांबलेला नाही.

शाळेचा संघर्षमय प्रवास

शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, हे लक्षात घेऊन आदिवासी फासेपारधी सुधार समितीचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. २२ सप्टेंबर २०१३ रोजी अमरावतीमधील मंगरूळ चव्हाळा या गावात ही ‘प्रश्नचिन्ह’ आदिवासी आश्रमशाळा सुरू केली. राज्यभर; तसेच देशातील काही मोठ्या शहरांमध्ये फिरून सिग्नलवर भीक मागणारी, कोणतेही काम करून पोट भरणारी समाजातील १८८ मुला-मुलींना गोळा करत एका संस्थेच्या गोदामात ही शाळा भरू लागली. ही जागा काढून घेण्यात आल्यानंतर माळरानावरील झोपड्यांमध्ये ही शाळा भरू लागली.

इमारत जमीनदोस्त झाली

अखेर दानशूर लोकांच्या सहकार्याने प्रश्नचिन्ह आश्रमशाळेची इमारत बांधून तयार झाली. पण, समृद्धी महामार्गाच्या कामामुळे ही इमारत पाडण्यात आली. इमारतीच्या नुकसान भरपाईपोटी मंजूर ६ कोटी रुपये तात्काळ देण्यात यावेत. तसेच पूर्वीच्या मंजूर ५१ लाखांपैकी रखडलेली १७ लाख रुपयांची उर्वरित रक्कम संस्थेला वर्ग करून प्रश्नचिन्ह आश्रमशाळेला १० एकर शेतजमीन आणि ११ वी-१२ वीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी संस्थेची मागणी आहे.

इतर मागण्या काय आहेत?

१४ एप्रिल १९९० पूर्वीपासून सरकारी ‘ई-क्लास’ शेतजमिनीवर काबाडकष्ट करणाऱ्या भूमिहीन फासेपारधी बांधवांना त्या जमिनींचे मालकी हक्काचे पट्टे कायदेशीररित्या नावावर करून द्यावेत, पारधी पॅकेजअंतर्गत शासनाने मंजूर केलेल्या ७ कोटी रुपयांच्या निधीपैकी १ कोटी ४० लाख रुपये ७ महिला बचत गटांना (प्रत्येकी २० लाख) रोजगार सुरू करण्यासाठी तात्काळ वितरित करावेत, मंगरुळ चव्हाळा येथील ९० पात्र फासेपारधी कुटुंबांना तात्काळ घरकुल मंजूर करावे आणि समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना स्वतःचा रोजगार सुरू करता यावा यासाठी राज्यात स्वतंत्र ‘फासेपारधी आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करावे, या प्रमुख मागण्या आहेत.

हातात पाटी पेन्सिल द्या

संस्थेचे संचालक मतीन भोसले यांनी अत्यंत भावूक आवाहन करताना म्हटले की, आमचा हा लढा कोणाविरुद्ध नसून केवळ आमच्या पुढच्या पिढीला सन्मानाने जगू देण्याची धडपड आहे. लोकांच्या सहकार्यावरच शाळेचा कारभार सुरू आहे. साधन-सुविधा नाहीत. शाळा चालवण्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शासन-प्रशासनाने फासेपारधी मुलांच्या भवितव्यासाठी प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा मतीन भोसले यांनी व्यक्त केली आहे.