अकोला : प्रवाशांची गैरसोय टळणार! अमरावती – पुणे एक्स्प्रेससंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे मंडळांतर्गत तांत्रिक कामामुळे ही रेल्वेगाडी पर्यायी मार्गाने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २७ आणि २८ मे रोजी सुटणाऱ्या अमरावती – पुणे व पुणे – अमरावती एक्स्प्रेस संदर्भात निर्णय बदलला आहे. हे दोन दिवस ही गाडी नियमित मार्गानेच धावणार आहे.
मध्य रेल्वे, पुणे मंडळात तांत्रिक कामामुळे रेल्वेगाड्यांवर परिणाम
मध्य रेल्वेच्या पुणे मंडळामार्फत दौंड-मनमाड विभागातील विसापूर – रांजणगाव – सारोळा स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वेगाड्यांचे नियोजित मार्ग बदलण्यात आले आहेत. यामध्ये गाडी क्रमांक ११०२६ व ११०२५ अमरावती – पुणे एक्स्प्रेसचा देखील मार्ग बदलण्यात आला होता. आता संबंधित निर्णयात सुधारणा करून रेल्वे प्रशासनाने या गाड्या त्यांच्या नियमित मार्गावरून चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक ११०२६ अमरावती – पुणे एक्सप्रेस २७ मे रोजी अमरावतीहून आपल्या नियमित मार्गाने सुटेल व पुणे स्थानकावर पोहोचेल. गाडी क्रमांक ११०२५ पुणे – अमरावती एक्स्प्रेस २८ मे रोजी पुण्याहून आपल्या नियमित मार्गाने सुटेल व अमरावती स्थानकावर पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून देण्यात आली.
२८ आणि २९ मे रोजी मात्र पुणे – अमरावती एक्स्प्रेस पर्यायी मार्गाने धावणार
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामामुळे काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. गाडी क्रमांक ११०२६ अमरावती – पुणे एक्स्प्रेस २८ मे रोजी अकोला, पूर्णा, परभणी, लातूर रोड, कुर्डुवाडी, दौंड मार्गे धावणार आहे. गाडी क्रमांक ११०२५ पुणे – अमरावती एक्स्प्रेस २९ मे रोजी दौंड, कुर्डुवाडी, लातूर रोड, परभणी, पूर्णा, अकोला मार्गे धावेल. गाडी क्रमांक १२६२७ एसबीसी-नवी दिल्ली एक्स्प्रेस सोलापूर, कुर्डुवाडी, लातूर रोड, परभणी व मनमाड मार्गे धावेल. गाडी क्रमांक ११४१० निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस २७ मे रोजी परभणी, लातूर रोड, कुर्डुवाडी, दौंड मार्गे धावेल. याशिवाय ही इतर अनेक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. प्रवासापूर्वी गाड्यांच्या वेळापत्रकाची व मार्गातील बदलांची माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी केंद्रातून तपासून घ्यावी. प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.
