अमरावती: विदर्भातील लोकप्रिय रीलस्टार जोडी तन्वी काकड आणि बिपीन माहोरे यांनी अलीकडेच साखरपुड्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारीत करून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. पण, त्याचवेळी चाहत्यांनी दोघांवर प्रश्नांची सरबत्तीही केली. अखेर या जोडीने दोघांमधील नात्याचे आणि त्यांच्या प्रेमप्रकरणाचे किस्से चाहत्यांसमोर रंजक शैलीत सादर केले आहेत.
तन्वी आणि बिपीन एकत्र कसे आले?
बिपीन आणि तन्वी हे दोघेही अमरावतीत राहणारे. बिपीन हा ‘टिकटॉक’च्या माध्यमातून आधीच लोकांपर्यंत पोहचला होता. त्याचे व्हिडिओ पसंत केले जात होते. तन्वी ही त्याची ‘फॅन’ होती. पण, २०२१ मध्ये एका प्रसंगाने त्यांना एकत्र आणले. हा किस्सा दोघांनी सांगितला. तन्वी म्हणाली, मला संगीत आवडते. बिपीनला एका ‘अल्बम’साठी कलावंताची आवश्यकता होती.
त्याआधी आमची एका ठिकाणी भेट झाली होती. बिपीनसोबत मला फोटो काढायचा होता, पण, बिपीन लगेच गाडीवर निघून गेला. नंतर ‘अल्बम’च्या निमित्ताने बिपीनसोबत भेटीगाठी सुरू झाल्या. तेव्हा आम्ही दोघे मित्र म्हणूनच एकत्र येत होतो. आमचा ‘अल्बम’ लोकांनी पसंत केला.
‘राखी’ बांधण्याचे प्रकरण काय?
तन्वीने एक रंजक किस्सा चाहत्यांना सांगितला. ती म्हणाली, बिपीन माझ्या घरी येत असे. तेव्हा त्याने माझ्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करण्यासाठी राखी बांधून घेण्याची तयारी दर्शवली होती. पण, जेव्हा प्रत्यक्ष वेळ आली, तेव्हा त्याने राखी बांधली नाही. बिपीन म्हणाला, मी तन्वीच्या प्रेमात पडलो होतो, पण व्यक्त होण्याची हिंमत होत नव्हती. अखेरीस धाडस केले आणि तन्वीला ‘प्रपोज’ केले, तेव्हा अक्षरश: माझे पाय थरथरले होते.
शेवट गोड कसा झाला?
तन्वी आणि बिपीन यांचा साखरपुडा पार पडला. पाच वर्षांच्या प्रेमानंतर दोघांनी घरच्यांच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. बिपीन म्हणाला, मी ‘प्रपोज’ तर केले, पण तन्वीने थेट नकार दिला. आपण दोघे मित्र म्हणूनच राहू, माझा तसा विचार नाही, असे तिने सांगितले, पण मी पक्का प्रेमवीर होतो. तू वेळ घे, निवांत विचार कर आणि नंतर मला उत्तर दे, असे मी तिला सांगितले. तन्वी म्हणाली, बिपीनने मला वेळ दिला अखेरीस मी होकार कळवला. माझ्यावर बिपीनने कधी दबाव टाकला नाही. बिपीन आजही माझा ‘बेस्ट फ्रेंड’ आहे. बिपीन म्हणाला मी आता ‘जेंटलमन’ झालो आहे.
