अमरावती : पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू असलेली दिसत आहे. उपलब्ध असलेल्या जागांसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज आले आहेत. अमरावती ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या २१४ जागांसाठी तब्बल २१ हजार २०० बेरोजगारांनी अर्ज केले असून सरासरी काढल्यास एका पदासाठी तब्बल १०० उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.

बारावी उत्तीर्ण शैक्षणिक अर्हतेच्या या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज केलेल्यांत पदवी, पदविका धारण करणारे आहेतच; सोबत अभियांत्रिकी व इतर शाखांचे उच्च शिक्षण घेतलेल्यांचेही प्रमाण अधिक आहे आणि त्यातही ग्रामीण भागातून सर्वाधिक भरणा आहे.

येत्या ११ फेब्रुवारीपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरवात होणार आहे. ग्रामीण पोलीस दलाची भरतीप्रक्रिया जोग स्टेडियममध्ये होणार असून, यापूर्वी घोषित भरतीप्रक्रिया राज्यामध्ये २० जानेवारीपासून सुरू होणार होती. त्यासाठी ग्रामीण पोलिसांनी देखील तयार सुरू केली होती. परंतु ग्रामीण भागात निवडणुका आल्याने २० जानेवारीपासून सुरू होणारी भरतीप्रक्रिया रद्द करण्यात आली होती. १ हजार ६०० मीटर धावचाचणी, १०० मीटर धावचाचणी, गोळाफेक, लांबउडी, उंचउडी, पुलअप या प्रमुख चाचण्या उमेदवारांना शारीरिक चाचणीच्या अंतर्गत द्याव्या लागतील. त्यापूर्वी त्यांची दस्तऐवज तपासले जातील.

२१४ पदे आणि २१ हजार २०० च्यावर अर्ज आल्यामुळे टप्प्याटप्याने युवक व युवतींना चाचण्यांसाठी पाचारण करण्यात आले आहे. शहर पोलीस दलात जागाच रिक्त नसल्याने येथे भरतीप्रक्रिया चालू वर्षात घेतल्या गेली नाही. ११ फेब्रुवारीपासून सुरू होणारी भरती ही जवळपास पंधरा दिवसांपर्यंत चालणार आहे. युवक-युवतीसाठी बारावी उत्तीर्ण ही अट ठेवण्यात आली असून, एकूण जागापैकी ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ११ फेब्रुवारीपासून नियोजन असले तरी त्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उमेदवारांनी एकापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये भरतीसाठी अर्ज सादर केले असले तरी त्यांना एकाच जिल्ह्यात भरतीसाठी उभे राहता येईल. भरतीप्रक्रिया पारदर्शक व्हावी, याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

गैरप्रकार रोखण्याचे आव्हान

शिपाई, चालकांसह इतर पदावर घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेत इअर बर्ड आणि इलेक्ट्रिक डिव्हाइसच्या माध्यमातून हायटेक कॉपी आणि बनावट हॉल तिकिटाच्या माध्यमातून प्रवेश मिळविण्याचे प्रकार याआधी घडलेले आहेत. मैदानी चाचणीत पायातील चिपची अदलाबदल करून उत्तीर्ण होण्याचे प्रकार घडले होते. वर्गामध्ये; तसेच मैदानावर घडणाऱ्या या गैरप्रकारांना रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.