अमरावती : ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रासेगाव येथे झालेल्या मोठ्या घरफोडीचा यशस्वी छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यात सहभागी असलेले तिन्ही आरोपी केवळ १४ वर्षांचे विधीसंघर्षित बालके असून त्यांच्याकडून ५ लाख ७३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

ज्या मुलाचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे आणि ज्याने कायद्याने गुन्हा ठरवलेली कृती केली आहे, त्याला विधीसंघर्षित बालक मानले जाते.

रासेगाव येथील रहिवासी साधना सुभाषराव नावकार या १४ ते २३ फेब्रुवारी दरम्यान कुटुंबासह बाहेरगावी गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण १२ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी पथ्रोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर यांच्या पथकाने या प्रकरणाचा तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

दर्यापूर बसस्थानक परिसरात संशयास्पद रित्या आढळलेल्या एका १४ वर्षीय मुलाला पालकांच्या उपस्थितीत विचारपूस केली असता या गुन्ह्याचे धागेदोरे हाती लागले. त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ही घरपोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पथ्रोट परिसरातून इतर दोन मुलांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या या मुलांकडून पोलिसांनी ३९.१९ ग्रॅम सोन्याचे दागिने त्याची किंमत अंदाजे ५ लाख ७३ हजार रुपये आहे, ते जप्त केले आहेत.

उर्वरित मुद्देमाल आणि रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. या कारवाईत आरोपींची वयोमर्यादा पाहता अत्यंत संवेदनशीलतेने आणि गुप्त माहितीच्या अचूक विश्लेषणावर भर देण्यात आला. केवळ चार दिवसांच्या आत गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे, पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भाबूरकर यांच्यासह अमोल देशमुख, सुधीर बावणे, मंगेश लाकडे, सचिन मसांगे आणि सायबर सेलचे सागर धापड व चालक मनोज घावळे यांनी केली.