अमरावती : ‘एमटीव्‍ही’ या वाहिनीवरील ‘हॅसल-२’ या कार्यक्रमात रॅप प्रकारातील गायनातून आपली स्‍वतंत्र ओळख निर्माण करणारी अमरावतीकर आर्या जाधव ही आता ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्‍या पर्वातील स्‍पर्धक म्‍हणून समोर आली आहे. तिच्‍या या कामगिरीबद्दल अमरावतीकरांनी आनंद व्‍यक्‍त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्या जाधव ही येथील उद्योजक हेमंत जाधव यांची कन्‍या आहे. कॅम्‍प परिसरात वास्‍तव्‍याला असलेल्‍या आर्या जाधव हिला गायनाची आवड आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्‍या पर्वाला रविवारपासून सुरूवात झाली.

हेही वाचा…नागपूर : धक्कादायक! प्रेम त्रिकोणातून पहिल्या प्रियकराचा खून

या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक म्‍हणून अभिनेता रितेश देशमुख जबाबदारी सांभाळत आहे. आर्या जाधव हिच्‍यासह वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतला आहे.

याआधी ‘एमटीव्‍ही’ या वाहिनीवरील ‘हॅसल-२’ या कार्यक्रमातील कामगिरीतून आर्या जाधव हिने प्रेक्षकांची मने जिंकली. रॅप हा गायन प्रकार तिने सादर केला होता. नऊवारी साडी परिधान करून आर्याने केलेले सादरीकरण अनेकांना भावले होते. करोना काळात घरी असताना आर्याला एक दिवस रॅप लिहिण्‍याची कल्‍पना सुचली. त्‍यानंतर घराच्‍या छतावर बसून आर्याने रॅप लिहायला सुरूवात केली.

हेही वाचा…नागपूर जिल्ह्यात रस्ते अपघात बळींची संख्या धक्कादायक, गडकरींनी दिला इशारा…

हळूहळू तिने मोबाईलवर शूट करून व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केले. तिच्‍या या सादरीकरणाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. ‘हॅसल-२’ या कार्यक्रमात आर्याने १० स्‍पर्धकांना मागे टाकत उपांत्‍य फेरी गाठली होती. या स्पर्धेसाठी देशभरातून सुमारे ११ हजार तरुण-तरूणींनी ऑडिशन दिले होते. त्यापैकी केवळ २५ रॅप गायकांचा या स्पर्धेत समावेश झाला होता. स्पर्धेतील उपांत्य फेरीतील स्पर्धकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला होता, परंतु आर्याला शेवटच्या क्षणी स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आणि ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही.

आर्या जाधवचा ‘क्‍यूके’ नावाचा स्वतःचा बँड आहे, जो यूट्यूबवर खूप धमाल करत आहे आणि रॅप गाणे पसंत करणाऱ्या तरुणांमध्येही हा बँड खूप लोकप्रिय आहे. तीन वर्षांपूर्वीच रॅप गायनाला सुरुवात करणाऱ्या आर्या जाधवने अल्पावधीतच रॅप गायनाच्या क्षेत्रात मोठे स्थान मिळवले आहे.

हेही वाचा…Video: चंद्रपुरात नदी-नाल्यांना पूर; पुलावरून कार वाहून गेली

आर्या जाधव हिने ‘रॅपर गर्ल’ म्‍हणून ओळख मिळवली आहे. आर्याने रितेश देशमुखसाठी खास रॅप लिहून तो मंचावर सादर करून दाखवला. ‘कलर्स मराठी’वर आता प्रेक्षकांना रोज रात्री ९ वाजता ‘बिग बॉस मराठी’ पाहता येणार आहे.

‘बिग बॉस मराठी-३’ चा विजेता शिव ठाकरे देखील अमरावतीचा आहे. त्‍याने हिंदी बिग बॉसही गाजवले होते. त्‍यामुळे आर्या जाधव हिच्‍या कामगिरीकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati s aarya jadhao joins bigg boss marathi season 5 as contestant mma 73 psg
Show comments