अमरावती: गायींना भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. पुराणकथांमध्ये गायीला अत्यंत पूज्य स्थान आहे. ऋग्वेदात गायीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. तत्कालीन कालखंडात दुग्धजन्य पदार्थ हे समाजाचा प्रमुख आहार स्त्रोत होते. अनेक संदर्भांतून भारतीय पुराणकथांमधील गायींचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व स्पष्ट होते. मात्र, एका गावात चक्क गायीचे मंदिर उभारण्यात आले आहे. या गावात गायींची नित्यनेमाने पुजा केली जाते. विशेष म्हणजे गायींना बसण्यासाठी चक्क कापसाच्या गाद्या दिल्या जातात. हे वर्षांनुवर्षे सुरू आहे.
का आहे विशेष महत्व?
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सार्सी हे पंधराशे लोकसंख्येचे छोटेसे गाव. या गावाच्या मध्यभागी गायीचे मंदिर आहे. गायीचे सार्सी म्हणून या गावाची ओळख. हे महात्म्य का आहे, याचाही इतिहास आहे. १८ व्या शतकात गावात साथीच्या आजाराचा प्रसार झाला होता. त्याचवेळी गावात एक गाय आली. ती बेलाच्या झाडाखाली सातत्याने बसायची. तिच्या अंगावर बेलपत्रे पडायची. तिच्यामुळे साथीच्या रोगाचे निवारण झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते. ती देवरुपी असल्याचा साक्षात्कार अनेकांना घडला. पुढे, या गायीने तिथेच वास्तव्य केले. या गायीचा वंश वाढत गेला. तेव्हापासून या गावात गायींची पुजा केली जात असल्याचे गावकरी सांगतात.
गायीला बसण्यासाठी गादी
१८ व्या शतकात आलेल्या या गायीच्या वंशावळीतील गायीला थेट घरातील गादीवर बसण्याचा मान आहे. गावात गायीचे मंदिर बांधण्यात आले. गायीचे मंदिर सहसा कुठे आढळत नाही. ते एकमेव महाराष्ट्रात असल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे. ग्रामस्थ हे गायींची काळजी घेतात. दर्शनासाठी येणारे अनेक भाविक गायींसाठी गादीचे आसन दान करतात. या ठिकाणी मोकाट जनावरांना कत्तलीसाठी नेण्यास बंदी आहे. या ठिकाणी गोशाळा आहेत, तेथे लोक स्वत:हून चारा आणून देतात, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.
गावात प्रत्येक घरात गाय
गावात सद्यस्थितीत तीन हजारांवर जनावरे आहेत. गायींसोबतच म्हशी आणि शेळ्यांचेही संगोपन होते. पशुपालकांनी चांगले गोठे उभारले आहेत. गावात दूधसंकलन केंद्र आहे. या ठिकाणी दरदिवशी सुमारे १ हजार लिटर दूध संकलन होते. दुधावर प्रक्रिया करून तयार पदार्थ हे तिवसा, तळेगाव, नेर या गावांमध्ये विक्री केले जातात. संकलित शेणाचा वापर शेतीत होतो. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासही मदत झाली आहे.
