अमरावती : परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि आक्षेपार्ह चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी चार आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आठवर पोहचली आहे. या प्रकरणी अद्याप पीडित मुली किंवा त्यांचे पालक तक्रारीसाठी अद्यापही समोर आलेले नाहीत, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आरोपींची संख्या वाढली
संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात पहिली अटक ही १९ वर्षीय मुख्य आरोपी अयान अहमद याची झाली होती. त्यानंतर अश्लील चित्रफिती आणि छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करणाऱ्या आणखी तीन आरोपींना काल पोलिसांनी अटक केली. तर हेच साहित्य एकमेकांना पुरविणाऱ्या आणखी चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यात येथील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कठोरा मार्गावरील एका सदनिकेत भाड्याने राहणाऱ्या एका युवकाचाही समावेश आहे. त्याने ही सदनिका आरोपी अयान अहमद याला उपलब्ध करून दिली होती. पोलिसांनी या घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला आहे. घरझडतीही घेण्यात आली आहे.
सदनिका उपलब्ध करून देणारा अटकेत
चौकशीदरम्यान आरोपी अयानने पीडित मुलींचे लैंगिक शोषण त्याच्या मित्राच्या सदनिकेवर केल्याची कबुली दिली होती. ही सदनिका पुरवणारा मित्र मानव दीपक सुगंधे (२०, रा. आर्वी, ह.मु. अमरावती) पोलिसांनी अटक केली आहे. तसेच इतर आरोपींकडून आक्षेपार्ह चित्रफिती प्राप्त करून त्या समाज माध्यमांवर प्रसारित करणारे आरोपी एैफाज खान मंजूर खान (२६), मोहम्मद इम्रान मोहम्मद साजिद (२१) आणि शेख नावेद शेख हसन (२१, तिघेही रा. अचलपूर) यांना देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तांत्रिक तपासाच्या आधारे अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती एकमेकांकडे प्रसारित करणाऱ्यापैकी एैफाज या आरोपीच्या घरझडतीतून लॅपटॉप, टॅब आणि हार्डडिस्क जप्त करण्यात आले आहेत आणि त्याची फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
चित्रफिती प्रसरित करणारे ‘रडार’वर
या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी आक्षेपार्ह चित्रफिती प्रसारित करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य पाहता सखोल तपास व्हावा, यासाठी सहायक पोलीस अधीक्षक शुभमकुमार यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक गठित करण्यात आले आहे.
