अमरावती: शहरातील इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील जागा भव्य स्मारकासाठी उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शेषनाग गजभिये यांनी रविवारी दुपारपासून प्रस्तावित स्मारकानजीकच ‘जिवंत समाधी आंदोलन’ सुरू केले आहे. जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, त्यासाठी आपला जीव गेला तरी चालेल, असे शेषनाग गजभिये यांचे म्हणणे आहे.

नेमके प्रकरण काय?

शहरातील इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिकरीत्या साजरी केली जाते. हजारो अनुयायी या स्थळावर येतात. त्यामुळे या जागेवर डॉ. आंबेडकर यांचे मोठे स्मारक व्हावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांनी आंदोलने केली आहेत. स्मारकासाठी उपलब्ध असलेली खासगी जागा हस्तांतरीत करण्यात यावी, अशी अपेक्षा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची आहे.

या प्रकरणात सद्यस्थिती काय आहे?

इर्विन चौकातील या खासगी जागेच्या हस्तांतरणासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. आतपर्यंत अनेक सामाजिक संघटनांनी निवेदने सादर केली आहेत, पण अद्यापही स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. सध्या या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. महापालिका प्रशासन देखील त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करीत नसल्याचा आरोप होत आहे.

शेषनाग गजभिये यांच्या मागण्या काय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची जागा हस्तांतरीत करावी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य रुग्णालय, असे करण्यात यावे, शिवटेकडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा १०१ फूट उंच पुतळा उभारण्यात यावा तसेच जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ५० फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशा मागण्या शेषनाग गजभिये यांनी केला आहे.

कमलताई गवई यांचा पाठिंबा

आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी पाठिंबा दिला असून त्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. या ठिकाणी भव्य स्मारक व्हावे, ही सर्वांचीच इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनस्थळी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असून शेषनाग गजभिये यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.