अमरावती: विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे किरण सरनाईक यांचा विजय झाला, तर काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना पराभूत व्हावे लागले. काँग्रेसच्या या पराभवावरून भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना जोरदार टोला लगावला आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्या ‘सेटिंग’मुळे अदिती पोहरे यांचा पराभव झाला, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.
‘रवी राणांना सर्व माहिती’
नवनीत राणा म्हणाल्या, अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढणाऱ्या अदिती पोहरे या सक्षम उमेदवार होत्या. पण, एखादा बळी जाण्यास तयार असेल, तर तो अमरावतीतून काँग्रेसचा उमेदवार होतो, अशी परिस्थिती झाली आहे. इतिहास पाहिला तर सर्वांना हे लक्षात येईल. काँग्रेसचा उमेदवार कितीही सक्षम असो, पण ज्या पद्धतीने नेत्यांनी ‘सेटिंग’ केली, ते आमदार रवी राणा यांना माहिती आहे. कोण तीन दिवस आधी शहर सोडून निघून गेले, हे रवी राणा यांना आणि ‘सेट’ होणाऱ्या काँग्रेसच्या नेत्याला माहित आहे.
काँग्रेसचा उमेदवार होण्याआधी विचार करावा
नवनीत राणा म्हणाल्या, यापुढे कोणीही काँग्रेसची उमेदवारी स्वीकारण्याआधी एक वेळा विचार करायला हवा. स्वत:चा बळी जाऊ द्यायचा नसेल, तर इतिहास पहावा. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या एका उमेदवाराला १७ मते मिळाली होती, त्यानंतर एका उमेदवाराला रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल व्हावे लागले किंवा आता नेते ‘सेट’ झाले आणि शहर सोडून निघून गेले.
इमानदार कोण हे वरिष्ठ नेत्यांना माहिती
नवनीत राणा म्हणाल्या, अमरावती शिक्षक मतदारसंघाची जबाबदारी घेण्यासाठी महायुतीतील अनेक जण तयार होते. पण, प्रामाणिकपणे कोणी काम केले, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगले ठाऊक आहे. रवी राणा यांच्या नियोजनपूर्वक कामामुळे हे यश मिळाले आहे. रवी राणा यांच्या व्यूहरचनेचा लाभ महायुतीला झाला आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी धडा घ्यावा
नवनीत राणा म्हणाल्या, देशभरातील विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले. या निवडणुका तर मतपत्रिकेद्वारे झाल्या, तरीही मतदारांनी काँग्रेसला नाकारले. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी आता निवडणूक आयोगावर आपल्या अपयशाचे खापर फोडणे थांबवावे. खोटा प्रचार जास्त दिवस करता येत नाही. ‘जेन झी’च्या भावना भडकावून स्वत:च्या राजकीय पोळ्या शेकण्याचे काम काँग्रेसने थांबवले पाहिजे.
