अमरावती : भारतीय तिरंदाजीच्या नकाशावर अमरावतीने आपले नाव पुन्हा एकदा सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. कोलकाता येथे पार पडलेल्या खुल्या निवड चाचणीत अमरावतीच्या तीन तिरंदाजांनी भारतीय संघात स्थान मिळवून नवा इतिहास रचला आहे. मधुरा धामणगावकर पाठोपाठ यशदीप भोगे आणि अवघ्या १६ वर्षीय कुमकुम मोहोडची जागतिक चषक (स्टेज १ आणि २) स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

या यशाचे वैशिष्ट्य म्हणजे १६ सदस्यांच्या भारतीय संघात महाराष्ट्राचे सहा खेळाडू असून त्यापैकी तीन एकट्या अमरावतीचे आहेत. महाराष्ट्र तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर यांनी या यशाचे वर्णन ’४५ वर्षांच्या कष्टाचे फळ’ असे केले आहे.

कुमकुमचा ‘निशाणा अचूक

केवळ १६ वर्षींय कुमकुम मोहोड हिने रिकर्व्ह प्रकारातील निवड चाचणीत १३.५ गुणांसह अव्वल स्थान पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या कुमकुमचे वडील मिठाईचे बॉक्स बनविण्याचे काम करतात. मला राष्ट्रीय स्पर्धेत खेळायचे होते, पण प्रशिक्षण प्रफुल्ल डांगे यांच्या आग्रहामुळे मी वरिष्ठ गटाच्या चाचणीत सहभाग घेतला आणि यशस्वी झाले, असे कुमकुमने सांगितले. प्रशिक्षक डांगे यांच्या मते कुमकुममध्ये आशियाई आणि ऑलिम्पिक पदक जिंकण्याची प्रचंड क्षमता आहे.

पक्षाघातावर मात करत यशदीपची भरारी

२६ वर्षीय यशदीप भोगेची कारकीर्द प्रेरणादायी आहे. २०१९ मध्ये पक्षाघाताच्या धक्क्यातून सावरून त्याने जिद्दीने पुनरागमन केले. निवड चाचणीत १२.७५ गुणांसह तिसरा क्रमांक पटकावत त्याने भारतीय संघात पहिल्यांदाच स्थान मिळवले. रेल्वेत कार्यरत असलेल्या यशदीपने एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले असून त्याने यापुर्वी बँकॉक आशिया चषक आणि ढाका येथील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. तो एक निर्भय खेळाडू आहे, अशा शब्दांत त्याचे प्रशिक्षक गणेश विश्वकर्मा यांनी त्याचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदकाची आशा

महाराष्ट्राकडे आता जागतिक दर्जाचे १० तिरंदाज असून सर्व १८ ते १३ वयोगटातील आहेत. २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्र भारताला निश्चितपणे पदक मिळवून देईल, या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असा विश्वास प्रमोद चांदूरकर यांनी व्यक्त केला आहे. २०२५ मध्ये संमिश्र कामगिरीचा अनुभव घेतल्यानंतर विदर्भाचे कंपाऊंड तिरंदाज नागपूरचा ओजस प्रवीण देवतळे आणि अमरावतीची मधुरा धामणगावकर यांनी मेक्सिको आणि शांघााय येथे होणाऱ्या विश्वचषक स्टेज १ आणि २ साठी भारतीय कंपाऊंड तिरंदाजी संघात स्थान मिळवले आहे. याशिवाय साताऱ्याचे आदिती स्वामी आणि साहिल जाधव यांनीही भारतीय संघात स्थान मिळवले आहे.