अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिनी बायपास मार्गावरील एका बारजवळ बुधवारी रात्री झालेल्या तरूणाच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात अमरावती गुन्हे शाखेला अवघ्या सहा तासांत यश आले. मद्यप्राशनानंतर झालेल्या क्षुल्लक वादातून ही हत्या झाल्याचे उघड झाले असून पोलिसांनी आरोपीला त्याच्या दुचाकीसह स्वावलंबी नगर परिसरातून ताब्यात घेतले आहे.

शुभम किशोर ठाकरे (२९) रा. मराठा कॉलनी, गोपालनगर, अमरावती असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी अनुप दीपकराव पांडे (४१) रा. दापोरी खुर्द, तिवसा, ह. मु. नवाथेनगर, अमरावती याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शुभम ठाकरे आणि त्याचा मित्र गणेश रामेश्वर पुसदकर (३९) रा. मराठा कॉलनी, गोपालनगर, हे दोघे मिनी बायपासवरील एका बारमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते.

दारू पित असताना शुभमने वेटरला सिगारेट मागितली. त्यावेळी त्यांच्या मागच्या टेबलवर बसलेल्या अनुपने त्यांना आपल्याजवळील सिगारेट दिली. माझ्याकडे भरपूर सिगारेट आहेत, येथे सिगारेट महाग आहे, असे तो त्यांना म्हणाला. त्यानंतर तो आपला दारूचा ग्लास घेऊन गणेश व शुभमच्या टेबलवर जावून बसला. त्याने त्याच्या ग्लासमधील थोडी दारू गणेश व शुभमच्या ग्लासमध्ये ओतली. तिघेही सोबत दारू पिले. त्यानंतर गणेश व शुभमने उरलेली दारू आपल्या ग्लासमध्ये भरली.

मात्र, त्यांनी अनुपचा ग्लास भरला नाही. याचा अनुपला राग आला. मी तुम्हाला दारू दिली, आता तुम्ही माझ्यासाठी दारू मागवा, असे तो त्यांना म्हणाला. गणेश व शुभमने त्याला नकार दिला. त्यावर त्याने त्यांचे दारूने भरलेले ग्लास खाली फेकून दिले. त्यामुळे गणेश व शुभम हे दारूचे बिल देण्यासाठी काउंटरवर गेले.

बिल भरून ते दोघे बारबाहेर पडले. घरी जाण्यासाठी गणेश व शुभम हे दुचाकी काढून त्यावर बसत होते. त्यावेळी अनुप हा पाठीमागून आला. तो शुभमला दुचाकीवरून खाली ओढू लागला. त्यामुळे गणेश व शुभम यांनी दुचाकीवरून उतरून अनुपला बाजूला ढकलले. त्यानंतर ते दोघे पुन्हा दुचाकीवर बसत होते. त्याचवेळी अनुपने शुभमला ओढून खाली पाडले.

त्यानंतर शुभम व अनुप यांच्यात झटापट सुरू होऊन ते दुभाजकापर्यंत गेले. त्यामुळे गणेश हा दुचाकी बाजूला उभी करून शुभमला सोडवायला जात होता. त्याचवेळी अनुपने जवळील चाकूने शुभमवर हल्ला चढविला, असा घटनाक्रम समोर आला आहे.