अमरावती : ताप, पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्‍याने खाजगी दवाखान्‍यात उपचार केल्‍यानंतर घरी आलेल्‍या दोन चुलत बहिणींचा शुक्रवारी पहाटे मृत्‍यू झाल्‍याची घटना धामणगाव रेल्‍वे तालुक्‍यातील विरूळ रोंघे येथे घडली आहे. अन्‍नातून विषबाधा झाल्‍याने या दोन बहिणींचा मृत्यू झाल्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नंदिनी प्रवीण साव (वय १०) आणि चैताली राजेश साव (११), अशी मृत मुलींची नावे आहेत. गुरुवारी दुपारी दोघी चुलत बहिणी एकत्र खेळल्या, मात्र अचानकपणे दोघींनाही पोटात दुखणे, ताप व हगवण लागल्याने धामणगाव रेल्वे येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. दोघींना उपचारानंतर घरी नेण्यात आले. मात्र अचानक रात्री दोघींची प्रकृती बिघडली. शुक्रवारी पहाटे नंदिनी व चैताली यांच्या अवघ्या दहा मिनिटांच्या फरकाने मृत्यू झाला.

हेही वाचा – नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू चौधरींनी केला ‘हा’ नवा रेकॉर्ड, निलंबनाची नामुष्की…

मृत नंदिनीची मोठी बहीण भक्ती (१३) व मृत चैतालीचा लहान भाऊ देवांश (३) यांना रात्रीला पोटात दुखू लागल्याने दोघांनाही शुक्रवारी पहाटे खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांची प्रकृती ठीक असल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. विरूळ रोंघे गावात एकाच घराशेजारी राहणाऱ्या साव कुटुंबातील दोन्ही मुलींचा अचानक मृत्यू झाल्याने हा अन्नातून विषबाधेचा प्रकार असू शकतो, असा प्राथमिक अंदाज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

साव कुटुंबीय हे शेजारीच राहतात. चैताली ही गावातील माधवराव वानखडे विद्यालयात इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होती तर नंदिनी प्राथमिक मराठी जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत इयत्ता चौथ्या वर्गात होती. नंदिनी काल गुरुवारी शाळेत गेली नव्‍हती. चैताली ही नेहमीप्रमाणे सकाळ सत्रात असलेल्या शाळेत गेली होती. ती घरी परतल्‍यानंतर दोघी एकत्र खेळल्‍या, पण अचानकपणे त्‍यांची प्रकृती बिघडली. दोघींनाही ताप, हगवण आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यांना धामणगाव येथील खासगी रुग्‍णालयात नेण्‍यात आले. उपचारानंतर त्‍यांना बरे वाटू लागल्‍याने दोघींनाही घरी आणण्‍यात आले. पण, रात्री त्‍यांची प्रकृती पुन्‍हा बिघडली आणि आज पहाटे दोघींचाही एकाचवेळी मृत्‍यू झाला. या घटनेने विरूळ रोंघे येथे शोकमय वातावरण आहे.

हेही वाचा – बुलढाणा : जिल्हा शल्य चिकित्सकांना मनमानी भोवली, कर्त्यव्यात कसूर केल्याप्रकरणी…

आरोग्य विभागाने विरूळ रोंघे येथे तपासणी शिबीर सुरू केले आहे. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य मंगेश गुल्हाने यांनी केली आहे दरम्यान, महसूल, पोलीस, आरोग्य प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. दोन्ही मुलींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा उलगडा शव विच्छेदनानंतर होऊ शकणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati simultaneous death of two sisters possibility of food poisoning mma 73 ssb
Show comments