अमरावती : अमरावती महापालिकेत युवा स्वाभिमान आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सहकार्याने भाजपची सत्ता स्थापन होईल, हे जवळपास स्पष्ट झाले असून अमरावतीच्‍या १७ व्या महापौरपदासाठी श्रीचंद तेजवानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पण, त्यांच्याकडे अडीच वर्षांपैकी सव्वा वर्षेच हे पद राहणार आहे. दुसऱ्या सव्वा वर्षासाठी ही जबाबदारी आशीष अतकरे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.

येथील हॉटेल महफिल इनमध्ये भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महापौरपदाच्या उमेदवारांची निवड जाहीर करण्यात आली. श्रीचंद तेजवानी हे नगरसेवकपदी दुसऱ्यांदा निवडून आले असून जवाहर स्टेडियम या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात. तर आशीष अतकरे यांनाही दुसऱ्यांदा नगरसेवक बनण्याची संधी प्राप्त झाली, ते गडगडेश्वर प्रभागातून निवडून आले आहेत.

पहिले सिंधी महापौर?

येत्या ६ फेब्रुवारी रोजी अमरावती महापालिकेच्या महापौरपदासाठी निवडणूक होणार असून श्रीचंद तेजवानी यांची महापौरपदी निवड झाल्यास ते पहिले सिंधी महापौर ठरणार आहेत. तेजवानी यांना महापौर बनवावे, अशी मागणी शहरातील ६ पूज्य सिंधी पंचायतींनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती.

यात रामपुरी कॅम्प, कृष्णानगर, कंवर नगर, बडनेरा, अनुप नगर, दस्तूर नगर पंचायतींचा समावेश होता. सिंधी समुदायाने नेहमीच भाजपला पाठिंबा दिला असल्याने या समुदायाला यावेळी संधी मिळावी, असे निवेदन सिंधी पंचायतींच्या वतीने पालकमंत्र्यांना देण्यात आले होते.

आशीष अतकरे यांना सव्वा वर्षांनतर महापौरपद मिळू शकेल. भाजपने दोघांची निवड जाहीर करून ‘सोशल इंजिनिअरिंग’ साधण्याचा प्रयत्न केला आहे.

युवा स्वाभिमानच्या विरोधात आले निवडून

श्रीचंद तेजवानी हे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार पुरूषोत्तम बजाज यांना पराभूत करून जवाहर स्टेडियम प्रभागातून निवडून आले आहेत. तर आशीष अतकरे यांनी गडगडेश्वर-रवीनगर प्रभागातून निकटचे प्रतिस्पर्धी असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. या दोघांच्या विरोधात युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी जोरदार प्रचार केला होता. सत्ता स्थापनेसाठी भाजपने युवा स्वाभिमानची मदत घेतली असली, तरी या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब करून भाजपने रवी राणा यांना स्पष्ट संकेत दिल्याचे मानले जात आहे.

उपमहापौरपद युवा स्वाभिमानकडे

उपमहापौरपद भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाकडे देण्याचा निर्णय भाजपने घेतला असून या पक्षातर्फे सचिन भेंडे यांना संधी मिळू शकेल. स्थायी समिती सभापतीपद कुणाला मिळेल, हे अद्याप ठरलेले नाही.