अमरावती: मूत्रपिंड प्रत्यारोपण म्हणजे ज्या व्यक्तीचे मूत्रपिंड सामान्यपणे कार्य करत नाही अशा व्यक्तीच्या शरीरात दात्याकडून निरोगी मूत्रपिंड ठेवण्याची शस्त्रक्रिया प्रक्रिया होय. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी साधारणपणे १० ते १५ लाख रुपयांचा खर्च होतो. पण, सरकारी योजना आणि सामाजिक संस्थांच्या मदतीतून ही शस्त्रक्रिया महाराष्ट्रातील काही रुग्णालयात विनाखर्च करणे शक्य आहे.
अमरावतीच्या विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) ७३ वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
मूत्रपिंडाच्या आजाराने रुग्ण त्रस्त
बंटी धर्माळे हे ३७ वर्षीय रुग्ण. मोर्शी तालुक्यातील सावरखेडा येथील रहिवासी. गेल्या काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यावर ते उपचार घेत होते. डायलिसीस सुरू होते. तेव्हा डॉक्टरांनी या रुग्णाला मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सरकारी योजनेच्या माध्यमातून विनामूल्य शस्त्रक्रिया शक्य असल्याचे या रुग्णाला सांगण्यात आले. त्यानंतर रुग्णाच्या कुटुंबीयांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये संपर्क साधला.
आईने मुलाला दिले नवजीवन
रुग्ण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पोहचल्यानंतर या ठिकाणी रुग्णाच्या आईला मूत्रपिंडदान करता येईल, याविषयी समूपदेशन करण्यात आले. त्यावेळी मुलाच्या पुढील भविष्याचा विचार करून आई सुरेखा अरुण धर्माळे (वय ५८) यांनी आपले एक मूत्रपिंड मुलाला देण्याचा निर्णय घेतला आणि त्याला नवीन जीवन दिले. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली.
डॉक्टरांचे लाभले सहकार्य
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी, युरो सर्जन डॉ.राहुल पोटोडे, डॉ.विक्रम देशमुख, डॉ. प्रतीक चिरडे, डॉ. विशाल बाहेकर, बधिरिकरण तज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ बालकृष्ण बागवाले, डॉ. दिपाली देशमुख, डॉ. शीतल सोळंकी, डॉ.विक्रांत कुळमेथे, डॉ.माधव ढोपरे, डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ.नाहीद, डॉ. रमणीय, डॉ. उज्वल अभ्यंकर, डॉ. प्रियंका कांबळे, डॉ. श्रद्धा जाधव, समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) शितल बोंडे, ऋषिकेश धस, डॉ.सोनाली चौधरी, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने मधील एम.सी.ओ.डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यांनी मुंदाने, कल्याणी गाढवे आणि परिचारिका, इतर कर्मचाऱ्यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये विशेष सहकार्य केले.
