अकोला : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून पश्चिम विदर्भातील राजकीय व शैक्षणिक वातावरण तापले आहे. हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये प्रचंड चढाओढ लागली. निवडणूक लढण्यावरून महायुतीत समन्वय, तर ‘मविआ’मध्ये बेबनाव उघड झाला. शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसने आपआपले उमेदवार जाहीर केल्याने ‘मविआ’मध्ये फूट पडली. भाजपने अमरावती वगळता इतर ठिकाणचे उमेदवार जाहीर केल्याने हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाणार असल्याचे संकेत प्रमुख नेत्यांनी दिले.

शिक्षक मतदारसंघाचा राजकीय आखाडा

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात उमेदवारांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली. उमेदवारीचे चित्र अद्यापही अस्पष्ट आहे. या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांसह विविध शिक्षक संघटनेतील इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येते. सुमारे वर्षभरापासून इच्छुकांनी तयारी सुरू केली. राजकीय पक्षांनी देखील निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करून मोर्चेबांधणी केली आहे. अमरावती विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघावर दीड दशकांपूर्वी शैक्षणिक संघटनांचे निर्विवाद वर्चस्व होते. आता मात्र हा मतदारसंघ राजकीय आखाडा झाला.

महाविकास आघाडीमध्ये फूट

राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदरसंघांची निवडणूक लढण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने बुलढाणा येथील प्रा. डी.एस. लहाने यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीसाठी काँग्रेसने देखील ऐनवेळी मोठा डाव टाकला. प्रा. आदिती पोहरे यांना पक्षात प्रवेश देऊन दुसऱ्याच दिवशी उमेदवारी जाहीर केली. माजी मंत्री तथा श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या त्या कन्या असून शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या स्नुषा आहेत. त्यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत वाढली. विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचे शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीला समोरे जाण्याचे प्रयत्न आहेत.

बंडाचा झेंडा; राष्ट्रवादी, वंचितच्या भूमिककडे लक्ष

गेल्या निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी शिक्षक आघाडीचे माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे हे सुद्धा शिवसेना शिंदे गटात असून त्यांनी वर्षभरापासून पाचही जिल्ह्यात दौरे सुरू केले. त्यांनी अपक्ष व शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरी होणार असल्याचे स्पष्ट आहे. भाजपकडे देखील इच्छुकांची संख्या मोठी आहे. ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याने भाजपतील इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. ते देखील बंडाचा झेंडा हातात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘मविआ’तील घटक पक्ष वेगवेगळे लढल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काय भूमिका घेतो? हे देखील महत्त्वपूर्ण ठरेल. वंचित बहुजन आघाडीने अद्याप आपले पत्ते खुले केले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही नेत्यांच्या भूमिकमुळे महायुतीमध्ये देखील मीठाचा खडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संघटनात्मक पातळीवर तयारी

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या मागे पक्षाची संपूर्ण यंत्रणा भक्कमपणे उभे राहील. संघटनात्मक पातळीवर तयारी झाली असून मतदारसंघात निश्चितच महायुतीला यश मिळेल, असा विश्वास विधिमंडळातील भाजपचे मुख्य प्रतोद आ. रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.