अमरावती: विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटासमोर वेगळाच पेच निर्माण झाला आहे. महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला सोडली जाणार, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. पण, पक्षाच्या उमेदवारीसाठी विद्यमान आमदार किरण सरनाईक आणि माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे हे दोघेही इच्छुक असल्याने पक्षाच्या निर्णयाकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.
प्रा. श्रीकांत देशपांडेंचा उमेदवारी अर्ज
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर आहे. महायुतीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. पण, त्याआधीच प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी आज उमेदवारी अर्ज सादर करून बंडाचे निशाण फडकवले आहे. देशपांडे यांनी दोन उमेदवारी अर्ज सादर केले असून एक पक्षातर्फे तर दुसरा अर्ज हा अपक्ष म्हणून भरला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना देशपांडे म्हणाले, मी १९९२ पासून शिवसेनेत कार्यरत आहे आणि पहिल्या दिवसांपासून शिवसेना शिंदे गटात आहे. त्यामुळे पक्षाच्या तिकिटावर माझाच पहिला अधिकार आहे. त्यामुळे मी पहिला अर्ज हा पक्षाकडून तर दुसरा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे.
पक्षाने उमेदवारी नाकारली तर
शिवसेना शिंदे गटाकडून मला उमेदवारी मिळेल, असा विश्वास आहे. तर पक्षाने उमेदवारी नाकारली, तरीही मी निवडणुकीतून माघार घेणार नाही. उमेदवारी मिळणे हाा माझा हक्क आहे. ती मिळाली नाही, तर शिक्षक आघाडी या संघटनेच्या बॅनरखाली मी निवडणूक लढविणार आहे, असे प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. यावेळी मतदारांना साडी वाटणारे वाटतील आणि घेणारे घेतील, पण शिक्षक मतदार अत्यंत सुज्ञ आहे. तो यावेळी ताकही फुंकून पिणार आहे, असा दावा श्रीकांत देशपांडे यांनी केला.
महायुतीची डोकेदुखी वाढली
महायुतीत भाजपतर्फे देखील अनेक उमेदवार इच्छुक आहेत. त्यात भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे तसेच चंद्रशेखर भोयर यांचा समावेश आहे. दोघांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पण, अमरावती शिक्षक मतदारसंघ हा महायुतीत शिंदे गटाला सोडण्याचे संकेत मिळाले आहेत. विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून आपली दावेदारी भक्कम केली आहे. आता उमेदवाराच्या नावाच्या घोषणेची प्रतीक्षा आहे.
