अमरावती: यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना जनगणनेचे काम करावे लागत आहे. सूर्य आग ओकत असल्यासारखी स्थिती आहे. त्यातच जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यासाठी कर्तव्यावर निघालेल्या शिक्षक प्रदीप गणोरकर यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना वरूड तालुक्यातील करजगाव येथे आज घडली. या घटनेमुळे संपूर्ण करजगावात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना कशी घडली?
प्रदीप गणोरकर हे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक होते. ते करजगाव येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत कार्यरत होते. तेथेच ते जणगणना प्रगणक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. सद्यस्थितीत वरूड तालुक्यातील तापमान ४५ अंश सेल्सिअस असल्याने या प्रखर तापमानात जनगणना करणे धोकादायक होते. गणोरकर यांनी आदल्या दिवशी प्रगणक म्हणून कर्तव्य बजावले. सकाळी सात वाजता ते कर्तव्यावर निघाले असता त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते परतीला गावाकडे निघाले. वाटेत खासगी रुग्णालयात दाखल झाले. मात्र तेथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यात त्यांचे निधन झाले. ते कुटुंबियांचा एकमेव आधार होते.
शिक्षक संघटनांचे निवेदन
या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने आज तहसिलदारांना निवेदन सादर करण्यात आले. प्रदीप गणोरकर यांच्या कुटुंबाला शासनाकडून योग्य आर्थिक मदत मिळावी, तसेच आवश्यक ती मदत व सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार पंकज चव्हाण यांनी शिक्षक संघटनांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत हे निवेदन तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
कुटुंबाला आर्थिक आधार देण्याची मागणी
प्रदीप गणोरकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शिक्षक संघटनांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांच्या कुटुंबाला न्याय व आर्थिक आधार मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी प्रकाश विंचूरकर, महेश्वर पवार, संजय बेले, विजय खोडस्कर, संजय कुंभारे, नंदकिशोर पाटील, रंजन कुमार राठोड, विलास टाकरखेडे, राजेंद्र बांबल, चंद्रकांत धार्मिक, जगदिश वानखडे, नरेश देउळकर, प्रभाकर टाकरखेडे, दीपेश वानखडे, किशोर भडांगे, संजय घोरपडे, रमेश सहारे, अमोल खासबागे, श्रीकांत खटाळे, शैलेश श्रीराव, गजानन चेपटे, राजेंद्र लांडे, संजय दळवी, रमेश पुंड, कल्पना घाटोळे, विजय भोंडे, सविता खोडस्कर, योगिता चांभारे, जया टाकरखेडे, आशीष गेडाम, अक्षय साबळे, वैशाली कुंभारे, शैला निवल, मनोज खुटाटे, गजानन हुड, उमेश पाटणकर, सोमेश्वर हरले, प्रकाश अलोणे, प्रमोद गेडाम, सुनील जाणे, आदी उपस्थित होते.
