अमरावती: वाघिणीच्‍या हल्‍ल्‍यात एका १८ वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी येथील शेतशिवारात रविवारी घडली. सुमारे दहा दिवसांपुर्वी मोर्शी तालुक्यात याच वाघिणीच्या हल्ल्यात एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनांनी गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, नागरिकांनी वनविभागाच्या विरोधात रोष व्यक्त केला. संतप्त जमावाने वनविभागाच्या वाहनांची तोडफोड केली. या वाघिणीला तत्काळ जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

नेमकी घटना काय?

संध्याकाळी ४ च्या सुमारास, उर्मिला इवाने (वय १८) ही तरुणी शेतात चारा कापण्यासाठी गेली असताना तिचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. चारा कापत असताना उर्मिलाला वाघीण आपल्या दिशेने येताना दिसली; तिने झाडावर चढण्याचा प्रयत्न केला, परंतु वाघिणीने तिच्यावर हल्ला करून तिला ओढत झुडपांमध्ये नेले. नंतर गावकऱ्यांना तिचा मृतदेह आढळला.

चांदूर बाजार तालुक्यातून मार्गक्रमणा

मोर्शी तालुक्यानंतर आता ही वाघिण चांदूर बाजार तालुक्यातून मार्गक्रमण करीत आहे. मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथे एका शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर, सुमारे ५० किलोमीटरचा प्रवास करून या वाघिणीने दोन दिवसांपूर्वी रिद्धपूर येथील मौजा नजरपूर शेत शिवारात एका शेतकऱ्याच्या गायीवर हल्ला केला होता. वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्यासाठी वनविभागाचे पथक रात्रभर पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावून दबा धरून बसले होते, परंतु वाघीण आपल्या शिकारीचे मांस खाण्यासाठी परतली नाही; त्यामुळे वनविभागाला रिकाम्या हाताने परतावे लागले.

सकाळी वाघिणीचे दर्शन

आज सकाळी रिद्धपूर येथील रहिवासी नौशाद हे मोटारसायकलवरून घाटलाडकीकडे जात होते. रिद्धपूरपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर त्यांना जालनापूर रस्त्याच्या कडेने वाघीण चालताना दिसली. नौशाद यांनी गावात परत येऊन रिद्धपूरमध्ये उपस्थित असलेल्या वन अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. पाऊलखुणांची पाहणी केल्यानंतर, वन अधिकाऱ्यांनी जालनापूरच्या रहिवाशांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या.

दोन शेळ्यांची शिकार

दरम्यान, सकाळी १० च्या सुमारास चांदूर बाजार तालुक्यातील सोनारी गावातून दोन शेळ्यांची शिकार झाल्याची बातमी आली. प्रत्यक्षदर्शी मेंढपाळ सोमा पराते यांनी सांगितले की, ते आपल्या शेळ्या घेऊन गावाजवळील झुडपी जंगलात पोहोचले होते, तेव्हाच वाघिणीने शेळ्यांवर हल्ला केला. घाबरलेल्या मेंढपाळाने झुडपी जंगलाचा आधार घेत गावाच्या दिशेने धाव घेतली, ज्यामुळे त्याचे प्राण वाचले.