अमरावती: चांदूर बाजार तालुक्यात सातपूड्याच्या पायथ्याशी मार्गक्रमण करीत असलेल्या वाघिणीने सोमवारी शिरजगाव कसबा नजीक शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर हल्ला केला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. दिनेश आवारे (वय ४५, रा. केणीपुरा, शिरजगाव कसबा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या अकरा दिवसांत वाघिणीच्‍या हल्‍ल्‍यात तीन जणांचे बळी गेले आहेत. या घटनेने चांदूर बाजार तालुक्‍यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कालच केला होता हल्ला

या वाघिणीने रविवारी सायंकाळी चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी गावालगत १८ वर्षीय युवतीवर हल्ला करून तिला ठार मारले होते. दरम्यान, या वाघिणीने देऊरवाडा परिसरात बकऱ्या आणि गायीवर हल्ला केला. त्यानंतर ती शिरजगाव परिसरात एका नाल्यातून जात असताना काही ग्रामस्थांना दिसली. दुपारच्या सुमारास शिरजगाव कसबा नजीक शेतात काम करीत असलेल्या दिनेश आवारे यांच्यावर वाघिणीने हल्ला केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. गेल्या २७ ऑगस्टला मोर्शी तालुक्यात भांबोरा येथे या वाघिणीच्या हल्ल्यात ५२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.

घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल

दरम्यान, हल्ल्यानंतर वाघिणीने परिसरातच ठाण मांडले असून, ती शिरजगाव कसबा परिसरातच असल्याची माहिती आहे. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. वाघिणीला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून हालचाली करण्यात येत आहेत.

ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे शिरजगाव कसबा परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, माजी खासदार आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी सोमवारी सोनोरी गावाला भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी लगेच वनमंत्री आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून थेट संपर्क साधून वाघिणीच्या शोधमोहिमेसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

५० किलोमीटरचा प्रवास

भांबोरा येथे शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर, सुमारे ५० किलोमीटरचा प्रवास करून या वाघिणीने तीन दिवसांपूर्वी रिद्धपूर येथील मौजा नजरपूर शेत शिवारात एका शेतकऱ्याच्या गायीवर हल्ला केला होता. वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्यासाठी वनविभागाचे पथक रात्रभर पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावून दबा धरून बसले होते, पण वाघिणीला जेरबंद करता आले नाही.