नागपूर : अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत चार जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जिवंत पकडण्याच्या मोहिमेचा शेवट तिच्या मृत्यूने झाल्याने वनविभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेशुद्धीकरणासाठी दिलेल्या औषधांच्या मात्रा, प्रतिऔषधांची उपलब्धता आणि बचाव पथकांमधील समन्वयाचा अभाव यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने या मृत्यूची सखोल चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत.
प्राथमिक अहवालात काय?
अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे सोमवारी वाघिणीचा ठावठिकाणा लागल्यानंतर तिला बेशुद्ध करून पकडण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिची प्रकृती खालावली आणि मृत्यू झाला. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अहवालात ‘हृदय-श्वसनक्रिया बंद पडणे’ हे प्रथमदर्शनी कारण नमूद करण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी अवयवांचे नमुने ऊतीशास्त्रीय व विषशास्त्रीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
डार्ट मारताना काय घडले?
दरम्यान, या एकूणच मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. वाघिणीला सुरुवातीला झायलाझिन आणि केटामाइन औषधांचे मिश्रण असलेला डार्ट मारला. अपेक्षित परिणाम न झाल्याने त्याच मिश्रणाचा दुसऱ्यांदा डार्ट मारला. त्यानंतर पुण्याच्या पथकाने मेडिटोमिडीन या औषधांचा नेम साधला आणि वाघीण बेशुद्ध झाली. त्यानंतर तिची प्रकृती खालावली. वाघिणीला आवश्यकतेपेक्षा अधिक औषध देण्यात आल्याचा आणि प्रतिमात्रा मिळाली नसल्याचा दावा केला जात आहे. तसेच ही वाघीण गर्भवती असल्याचे देखील सांगितले जात आहे.
स्थानिक चमुला का डावलले?
विदर्भातील वाघ आणि येथील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज असणाऱ्या आणि संघर्षग्रस्त वाघांना पकडण्याचा अनुभव असलेल्या चंद्रपूर, नवेगाव-नागझिरा, नागपूर आदी ठिकाणच्या अनुभवी बचाव पथकाला या मोहिमेत का प्राधान्य देण्यात आले नाही, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या या मोहिमेतील भूमिकेविषयी ट्रस्टचे नचिकेत उत्पट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
अधिकाऱ्यांकडून बचावात्मक पवित्रा
‘स्थानिक बचाव पथकावर ताण असल्याने आम्ही इतर बचाव पथकांना बोलावण्याबाबत मुख्य वन्यजीव रक्षकांशी चर्चा केली. पुण्यातील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टकडून आम्हाला लवकर प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले, असे अमरावती वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांनी सांगितले. पहिला नेम चुकला. त्यानंतर दुसऱ्यांदा अचूक नेम साधला गेला. मात्र, या बेशुद्धीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचे प्रमाण चुकले असण्याची शक्यता आहे. परतवाड्याच्या चमूने दोन्हीवेळा नेम साधले. पुण्याच्या ‘रेस्क्यू’ संस्थेची यात कोणतीही भूमिका नव्हती. तसेच मृत पावलेली वाघीण गर्भवती नव्हती, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम.एस. रेड्डी यांनी सांगितले.
