अमरावती: विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानासमोर शुक्रवारपासून आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. शेकडो विद्यार्थी यवतमाळच्या दिशेने पायीच निघाले आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी खासदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम हे देवगाव मार्गावर पोहचले होते.
विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत?
आदिवासी विद्यार्थ्यांनी येथील आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त, उपायुक्त आणि सहायक आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली होती. पण, त्यातून तोडगा निघू शकला नाही. १४ ऑगस्टचा शासन निर्णय रद्द करावा, वसतिगृहांची क्षमता वाढवावी, जुना अध्यादेश रद्द करावा, जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे, केंद्रिय स्वयंपाकगृह बंद करावे, तसेच १२ हजार ५०० अधिसंख्य पदांची भरती तसेच ८५ हजार रिक्त पदे भरावीत, सर्पदंश आणि प्रकृतीकडे दुर्लक्षामुळे मृत्यूमुखी पडलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
आणि विद्यार्थी पायीच निघाले
गुरूवारी सकाळपासून अपर आयुक्त संदीप गोलाईत, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला आणि उपायुक्त श्रीकांत धोटे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या काही मागण्या शासनस्तरावरील असून इतर मागण्या मान्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, पण विद्यार्थ्यांनी यवतमाळकडे पायीच कूच करण्याचा निर्णय घेतला.
खासदार आणि माजी आमदार पोहचले
आंदोलक विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप हे देवगाव मार्गावर पोहचले. पायी न जाता खासगी वाहनांमधून यवतमाळ येथे पोहचता येऊ शकते, त्याची व्यवस्था आम्ही करतो, असे त्यांनी सांगून पाहिले, पण ते पायीच जाण्यावर अडून होते. दरम्यान, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम हे विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्यासाठी मार्गावरील सांगुलवाडा येथे पोहचले. विद्यार्थ्यांनी पायी चालत जाणे योग्य नाही. स्वत: आदिवासी विकास मंत्री या ठिकाणी येण्यास तयार आहेत, तोपर्यंत आपण वाट पाहू, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले, पण, विद्यार्थी पायी चालत जाण्यावर ठाम आहेत. बाभुळगावमार्गे यवतमाळला पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
