अमरावती : महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांमुळे महिलांना स्वतःचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याची संधी मिळत आहे. आतापर्यंत ‘लखपती दीदी’ योजनेचा जिल्ह्यातील १.८७ लाख महिलांना फायदा झाला आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत जिल्ह्यात महिला बचत गटांची चळवळ वेगाने वाढत असून, बँकांच्या माध्यमातून कर्जपुरवठाही करण्यात येत आहे. यामुळे महिला स्वावलंबी होत असून विविध उत्पादने घेऊन त्यांची विक्रीही करीत आहेत. तसेच जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये ८३ हजार महिला लखपती दीदी झाल्या होत्या. तर आता चालू आर्थिक वर्षात यामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण १ लाख ८७ हजार २०९ इतक्या लखपती दीदी आहेत.

नेमकी काय आहे योजना?

आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांना बिनव्याजी ५ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणे हे लखपती दीदी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे महिला आर्थिक अडचणींपासून मुक्त होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आणि वाढविण्यास सक्षम होणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तिकरणावर सरकारचा विशेष भर आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे.

३०० कोटींचे कर्जवाटप

जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ६६६ महिला बचत गटांना सुमारे २९६ कोटी ३० लाखांपेक्षा जास्त महिला स्वयंसहायता बचत गटांना कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. ‘उमेद’ अभियानांतर्गत जिल्ह्याला १ लाख लखपती दीदींचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे १.८७ लाख लखपती दीदींचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.

काय आहे पात्रता?

लखपती दीदी योजनेसाठी खालील प्रमाणे पात्रता आहे :

-या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करु शकतात लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवासी असावी.
-या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे वार्षिक उत्पन्न हे ३ लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. त्या पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
-लखपती दीदी योजनेचा लाभ घेणारी महिला ही कमीत कमी १८ तर जास्तीत जास्त ५० वर्षांची असावी.
-या योजनेसाठी अर्ज करणारी महिला बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक आहे.