अमरावती: लग्नसमारंभाच्या आनंदावर काळाने विरजण घातल्याची दुर्देवी घटना मंगळवारी सकाळी घडली. वरूड-मोर्शी महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने हा अपघात घडला. यामध्ये एका तीन वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या आईचा आणि आजोबांचा मृत्यू झाला, तर कारचालक गंभीर जखमी झाले आहेत.

खडका फाट्याजवळ अपघात

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथील कामठी खैरी भागातील विनायक कॉलनी येथील रहिवासी असलेले नांदे कुटुंब एका लग्नकार्यासाठी जात होते. त्यांची कार (एमएच ४०/ केआर ०७२१) वरूड-मोर्शी महामार्गावरील खडकी फाट्याजवळ आली असता, चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडावर जाऊन धडकले. ही धडक इतकी जबर होती की, कारचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

मृतांची ओळख पटली

या अपघातात समाधान किसनराव नांदे (६२), किरण गोपाल नांदे (२८) आणि दिया गोपाल नांदे (३) या तिघांचा मृत्यू झाला. समाधान नांदे यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या किरण आणि चिमुकल्या दिया हिला वरूड येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना त्यांनी वाटेतच प्राण सोडले. कार चालवणारे गोपाल समाधान नांदे (३४) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मदतकार्य आणि तपास

अपघाताचा आवाज ऐकताच खडका येथील सरपंच राहुल फुले आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बेनोडा येथून तातडीने रुग्णवाहिका पाचारण करून जखमींना बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बेनोडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. अपघात नेमका कशामुळे झाला-तांत्रिक बिघाड की, चालकाला आलेली डुलकी-याचा तपास पोलीस करीत आहेत. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरदिवशी ४३ जणांचा मृत्यू

राज्यात दररोज सरासरी १०३ रस्ते अपघात घडत आहेत. प्राणघातक अपघातांची संख्या दैनंदिन सुमारे ४० असून त्यामध्ये दरदिवशी ४३ जणांचा अपघाती मृत्यू होतो. परिवहन विभागाने दिलेल्या या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यानच्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले. मोठ्या संख्येने होणारे अपघात व त्यात होणारी प्राणहानी लक्षात घेता रस्ते वाहतुकीदरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. परिवहन विभागाने मात्र प्राणघातक अपघातांच्या संख्येत सात टक्क्यांनी, तर अपघाती मृत्युच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी घट झाल्याचा दावा केला